तेलनाडेसह इचलकरंजीतील ५१ जण हद्दपार
By Admin | Updated: August 27, 2014 23:23 IST2014-08-27T22:46:25+5:302014-08-27T23:23:33+5:30
गावभाग पोलिसांची कारवाई : मनसे शहर अध्यक्ष, नगरसेविकेच्या पतीचा समावेश

तेलनाडेसह इचलकरंजीतील ५१ जण हद्दपार
इचलकरंजी : गणेशोत्सव काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गावभाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील ५१ जणांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच अन्य गुन्हे दाखल झालेल्या गुन्हेगारांवरदेखील तहसीलदार यांच्यासमोर शपथपत्र सादर करण्यासंदर्भातील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गावभाग व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे एक हजारजणांचा यामध्ये समावेश आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हद्दपारीचे आदेश लवकरच काढण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव काळात समाजामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस खात्याच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगरसेवक संजय तेलनाडे, नगरसेविकेचा
पती बंडोपंत मुसळे, मनसेचे शहर अध्यक्ष मोहन मालवणकर, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मलकारी लवटे, अमर
मगदूम, रॉबर्ट आवळे, जितेंद्र हजारे, समरजित पाटील, उल्हास पाटील, आदींसह भरत
खारगे, शीतल इजारे, दिलीप माने, सचिन पताडे, युवराज
पताडे, प्रवीण पवार, अस्लम सोलापुरे यांच्यासह सुमारे ५१ जणांना गणेशोत्सव काळात तालुका बंदी करण्यात आली आहे.
तहसीलदारांच्या आदेशाने संबंधितांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू असून, गणेशोत्सव काळात यापैकी कोणीही शहरात आढळला, तर त्याच्यावर पुन्हा कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक बी. एम. नलवडे यांनी सांगितले. तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवरदेखील अशीच कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)