५०० मीटर रस्त्यासाठी रोज लाखाचा भुर्दंड
By Admin | Updated: December 19, 2014 00:10 IST2014-12-18T23:37:17+5:302014-12-19T00:10:49+5:30
रंकाळा टॉवर ते जुना वाशीनाका रस्ता : एसटीच्या दीडशे फेऱ्या फुलेवाडीमार्गे; प्रतिमाणसी ६ रुपये तिकीट जादा

५०० मीटर रस्त्यासाठी रोज लाखाचा भुर्दंड
प्रकाश पाटील - कोपार्डे -जावळाचा गणपती ते जुना वाशीनाका दरम्यान असणारा केवळ ५०० मीटरचा रस्ता खराब असल्याने कोल्हापूर-राधानगरी मार्गावर एस. टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दररोजचा एक लाखाचा भुर्दंड बसत आहे. गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आतापर्यंत कोट्यवधीचा फटका बसला आहे. याला कोल्हापूर महानगरपालिकाच जबाबदार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या हद्दीतील जाऊळाचा गणपती ते राजकपूर यांचा पुतळा, जुना वाशीनाकापर्यंतचा रस्ता ‘आयआरबी’च्या रस्ते विकास प्रकल्पांतर्गत खुदाई करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत केवळ ५०० मीटर लांबी असलेल्या या रस्त्यावर अद्याप डांबर पडलेले नाही. एवढेच नाही, तर यावर साधी खडी पडलेली नाही. याचा त्रास या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांबरोबर रहिवाशांनाही होत आहे. धुळ, खड्डे या त्रासाला जनतेलाच तोंड द्यावे लागत असून, महापालिकाच काय ‘आयआरबी’नेही इकडे लक्ष दिले नाही.
रस्ता खराब असल्याने पूर्वी कोल्हापूर-राधानगरीमार्गे होणारी प्रवासी वाहतूक एस.टी. महामंडळाने फुलेवाडीमार्गे वळविली असून, त्याचा फटका या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना बसत आहे. या मार्गावर कोल्हापूर-राधानगरी अशा जवळ जवळ ९० ते १०० एस. टी. फेऱ्या आहेत. त्याशिवाय या दरम्यान असणाऱ्या गावांमध्ये लोकल फेऱ्या २५ ते ३०, तर लांब फेऱ्या १५ ते २० अशा १४० ते १५० फेऱ्या होतात. हा रस्ता खुदाईअगोदर येथूनच कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील सर्व फेऱ्या सुरू होत्या. मात्र, गेली चार वर्षे एस.टी. महामंडळाने आपल्या सर्व फेऱ्या फुलेवाडीमार्गे वळविल्या आहेत.
यामुळे लोकल म्हणजे हळदी, कांडगाव या गावांपर्यंत अर्ध्या स्टेजची वाढ झाल्याने एका व्यक्तीला ६ रुपये, तर त्यापुढे अंतर वाढत जाईल, तसे ते एक स्टेजनी वाढल्यामुळे प्रती व्यक्ती १२ रुपये जादा मोजावे लागतात. या मार्गावर केवळ एस.टी.मधून प्रवास करणारे ८ ते १० हजार प्रवासी आहेत. याचा प्रती व्यक्ती जरी १० रुपये या ५०० मीटरच्या रस्त्याने बसत असलेल्या भुर्दंडाचा विचार केल्यास दररोज ९० हजार ते एक लाख रुपयांचा फटका बसत असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत रंकाळा आगाराशी संपर्क साधला असता, गेली चार वर्षे हा मार्ग बंद असल्याने फुलेवाडीमार्गे एस.टी. सुरू आहे. त्यामुळे अर्धा ते एक स्टेजची वाढ होत असून, त्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले. आता या रस्त्याची खुदाई पूर्ण झाली असून, तो कधी दुरुस्त होणार, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
रंकाळा ते जुना वाशीनाका दरम्यानचा रस्ता गेली चार वर्षे दुरुस्तीसाठी खोदल्याने एस.टी.च्या फेऱ्या फुलेवाडीमार्गे सुरू आहेत. त्यामुळे तिकिटात अर्धा ते एक स्टेजमध्ये वाढ असून, याला कोल्हापूर महानगरपालिकाच जबाबदार आहे. ५०० मीटर रस्ता करण्याची ताकद जर पालिकेत नसेल, तर रस्ता उकरलाच का? आता जनतेला बसलेल्या आर्थिक तोट्याला पालिकाच जबाबदार आहे.
- पांडुरंग मुदगल, हळदी-कांडगाव प्रवासी