यंत्रमाग उद्योगावर ५० टक्के वीज दरवाढीचा बोजा
By Admin | Updated: December 9, 2014 00:59 IST2014-12-09T00:39:31+5:302014-12-09T00:59:08+5:30
वीज प्रतियुनिट चार रुपये ८५ पैसे : प्रतिमाह ७०६ कोटी रुपयांचे अनुदान रद्द झाल्याने दरवाढीची कुऱ्हाड

यंत्रमाग उद्योगावर ५० टक्के वीज दरवाढीचा बोजा
इचलकरंजी : विजेच्या दरामध्ये साधारणत: २० टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असताना यंत्रमाग उद्योगाला प्रत्यक्षात ५० टक्के दरवाढीची वीज बिले लागू झाली आहेत. महावितरण कंपनीला राज्य शासनाकडून दरमहा देण्यात येणारे ७०६ कोटींचे अनुदान बंद केल्याने वीज दरवाढ झाली आहे. व्यावसायिक मंदीच्या संक्रमणातून जात असलेल्या यंत्रमाग उद्योगावर वीज दरवाढीचा बोजा बसल्याने या उद्योगाचे आता कंबरडेच मोडले आहे.
सन २०१२-१३ मध्ये वीज उत्पादनात आलेल्या नुकसानीपोटी वीज दरवाढ करण्यास महाराष्ट्र राज्य ऊर्जा नियामक आयोगाने मंजुरी दिली होती. त्यामुळे सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांवर वीज दरवाढीचे संकट उभे राहिले होते; पण तत्कालीन कॉँग्रेस आघाडी शासनाने वीज दरवाढीचा बोजा जनतेवर पडू नये म्हणून दरमहा ७०६ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. आता विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या भाजप सरकारने विजेचे अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला. परिणामी नोव्हेंबर महिन्यापासून येणाऱ्या बिलांमध्ये वाढ झाली आहे.
नवीन वीज दरवाढ साधारणत: वीस टक्के असेल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र यंत्रमाग उद्योगासाठी प्रतियुनिट असणारा ३ रुपये २५ पैसे दर सध्या देण्यात आलेल्या वीज बिलामध्ये ४ रुपये ८५ पैसे झाला आहे. प्रतियुनिट १ रुपये ६० पैसे प्रमाणे दरवाढीची बिले येथील यंत्रमागधारकांना मिळाल्यामुळे जोरदार खळबळ उडाली आहे. कापड उत्पादनासाठी प्रतिपीक १ पैसा वीज खर्च येत होता. तो आता दीड पैसा इतका येणार आहे.
सूतदराच्या अस्थिरतेमुळे यंत्रमाग उद्योग अस्वस्थ आहे. त्यातच कापडाला मागणी नसल्याने गेल्या तीन-चार महिन्यांपासून मंदीचे वातावरण आहे. त्यातच वीज दरवाढीचा फटका बसल्याने यंत्रमाग उद्योजक हवालदिल झाले आहेत. (प्रतिनिधी)
पुन्हा रस्त्यावरील लढाई : महाजन
इचलकरंजी व परिसरामध्ये असलेल्या यंत्रमाग कारखान्यांना महिन्याला साधारणत: ११ कोटी रुपये वीज बिल येते. त्यामध्ये वाढीव वीज बिलाप्रमाणे सहा ते आठ कोटी रुपये इतकी वाढ होईल. सध्या यंत्रमाग उद्योग हा प्रचंड मंदीत असून, कापडाला ग्राहक नाही. त्यातच वीज बिलाची कुऱ्हाड कोसळली आहे. यातून यंत्रमाग उद्योग वाचायचा असेल, तर पुन्हा अनुदान चालू करण्याची मागणी शासनाकडे करावी लागेल. त्यासाठी यंत्रमागधारकांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी केले.