कामगारांच्या संपामुळे ५० टक्के यंत्रमाग बंद
By Admin | Updated: July 31, 2015 22:48 IST2015-07-31T22:48:42+5:302015-07-31T22:48:42+5:30
दररोज ६० कोटी रुपयांच्या कापडाचे उत्पादन ठप्प : संपाची कोंडी कशी फुटणार, वस्त्रनगरीला चिंता

कामगारांच्या संपामुळे ५० टक्के यंत्रमाग बंद
राजाराम पाटील- इचलकरंजी -सायझिंग-वार्पिंग कामगारांच्या संपामुळे सुताची बिमे मिळत नसल्याने शहर व परिसरातील ५० टक्के यंत्रमाग कारखाने बंद पडले आहेत. परिणामी दररोज सुमारे ६० कोटी रुपये किमतीच्या कापडाचे उत्पादन ठप्प झाले असून, संपाची कोंडी कशी फुटणार, याचीच चिंता येथील उद्योजक-व्यापाऱ्यांना लागली आहे.शासनाने जाहीर केलेल्या यंत्रमाग कामगार सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मंगळवार (२१ जुलै) पासून सायझिंग-वार्पिंग कामगारांनी बेमुदत संप सुरू केला. सुरुवातीला ७० टक्के सायझिंग कारखाने बंद पडले. संपाचे लोण वाढत जाऊन आता ९० टक्के सायझिंग कारखाने बंद पडले आहेत. अशा पार्श्वभूमीवर आमदार सुरेश हाळवणकर यांनी कामगार मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे लालबावटासायझिंग-वार्पिंग कामगार संघटना व सायझिंगधारक कृती समितीची यांची २८ जुलैलाबैठक घेतली.यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या सुधारित किमान वेतनाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने न्यायप्रविष्ट किमान वेतनासाठी कामगार संघटनेने केलेला संप बेकायदेशीर आहे आणि न्यायप्रविष्ट विषयावर आम्हाला बैठकीत म्हणणे मांडता येणार नाही, अशी भूमिका सायझिंगधारक समितीने मुंबईतील मंत्री मेहता यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत घेतली, तर न्यायालयाने किमान वेतनाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलेली नाही. परिणामी किमान वेतन मागण्याचा हक्क कामगारांचा आहे, असे म्हणणे कामगार संघटनेने मांडले. यावर कामगार मंत्री मेहता यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत संप मागे घ्यावा, असे आवाहन केले; पण कामगारांना विचारून सांगतो, असे म्हणून मुंबईतून परत आलेल्या कामगार संघटनेने संप चालूच राहण्याची घोषणा केली.गेले अकरा दिवस संप चालू असल्याने यंत्रमाग कापड विणण्यासाठी लागणाऱ्या बिमांची निर्मिती ठप्प झाली आहे. त्यामुळे शहर व परिसरातील सव्वा लाख यंत्रमागासाठी बिमे मिळत नसल्याने कापडाच्या उत्पन्नात ५० टक्के घट झाली आहे. दररोज ६० कोटी रुपयांच्या कापडाची निर्मिती थांबल्याने वस्त्रनगरीला आता आर्थिक टंचाईने ग्रासले आहे. वस्त्रोद्योगात असलेली मंदी आणि कापड उत्पादनाबरोबर खरेदी-विक्रीची उलाढालही थांबली. अशा दुहेरी कचाट्यात येथील यंत्रमाग उद्योग सापडला आहे. त्याचा परिणाम शुक्रवारी आठवडी बाजारानिमित्ताने होणाऱ्या कामगारांच्या पगारावरही झाला आहे.
आॅटोलूम उद्योगावरही परिणाम
सायझिंग कामगारांच्या संपाचा परिणाम आता आॅटोलूम उद्योगामध्येसुद्धा दिसू लागला आहे. सुमारे दहा टक्के आॅटोलूम बंद पडले असून, आणखीन आठवडाभराने ५० टक्के आॅटोलूम बंद पडतील. याचबरोबर आॅटोलूम उद्योगात सध्या मंदी असून, जॉब रेट प्रतिपीक दोन ते तीन पैशांनी कमी झाला आहे, तर काही कारखान्यांमधून २४ तासांऐवजी बारा ते सोळा तास कारखाने सुरू आहेत, अशी माहिती इचलकरंजी शटललेस लूम्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोरखनाथ सावंत यांनी सांगितली.
हेकेखोर कामगार नेत्याला वठणीवर आणण्याची वेळ
सायझिंग कामगारांच्या संपाबाबत वस्त्रनगरीचे नेते म्हणवून घेणाऱ्या पुढाऱ्यांनी एकजूटपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. सायझिंग कामगारांचे नेतृत्व म्हणून नेहमी आडमुठे धोरण घेत शहराला वेठीस धरणाऱ्या तथाकथित कामगार नेत्याला आता वठणीवर आणण्याची वेळ आली आहे. नाही तर इचलकरंजीच्या यंत्रमाग उद्योगाची वाट लागेल, अशी तिखट प्रतिक्रिया शहरातील यंत्रमागधारक संघटनांकडून व्यक्त करण्यात आली.