कळंबा कारागृहातील ५० टक्के बंदीजन लसीकरणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:16 IST2021-07-08T04:16:50+5:302021-07-08T04:16:50+5:30

कोल्हापूर : कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या बंदींना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचे उच्च न्यायालयाचे धोरण आहे. तरीही लसीच्या तुटवड्यामुळे कळंबा ...

50% inmates of Kalamba jail deprived of vaccination | कळंबा कारागृहातील ५० टक्के बंदीजन लसीकरणापासून वंचित

कळंबा कारागृहातील ५० टक्के बंदीजन लसीकरणापासून वंचित

कोल्हापूर : कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या बंदींना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचे उच्च न्यायालयाचे धोरण आहे. तरीही लसीच्या तुटवड्यामुळे कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बंदींचे लसीकरण रखडले आहे. कारागृहातील अद्याप ५० टक्के बंदीजन लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. कारागृहातील बंदीजनांना कोरोनाची लागण होऊ नये तसेच लसीकरणाचा डोस उपलब्ध व्हावा यासाठी कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूलकर हे प्रयत्नशील आहेत.

येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात गंभीर गुन्ह्यातील शिक्षा भोगणारे बंदीजन आहेत. कळंबा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक बंदीजन असल्यामुळे कोरोनाचा शिरकाव झाल्यास त्याचा मोठा धोका होण्याची शक्यता असल्याने कारागृहातील न्यायालयीन बंदी व पाच वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणारे बंदी यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जामीन व पॅरोलवर सोडण्यात आले आहे. असे सुमारे ७०० कैदी आज पॅरोल व जामिनावर बाहेर आहेत. तसेच नवीन दाखल होणाऱ्या न्यायालयीन बंदींना आयटीआय वसतिगृहात तयार केलेल्या आपत्कालीन कारागृहात दाखल करण्यात येत होते. त्यामुळे कळंबा कारागृहात कोरोनाला रोखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

जामीन व पॅरोलवर बाहेर असलेले बंदीजन वगळता सध्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात सुमारे दोन हजारावर बंदीजन शिक्षा भोगत आहेत.

कळंबा कारागृहातील ४५ वर्षांवरील सुमारे ४०० बंदींना, तर ४५ पेक्षा कमी वय असलेल्या ३०० बंदींना लसीकरणाचा पहिला डोस दिला आहे. तसेच ४५ पेक्षा कमी वय असलेल्या सुमारे १३०० हून अधिक बंदीजनांना अद्याप लसीचा पहिलाही डोस मिळालेला नाही. त्यामुळे कारागृहात कोरोनाचा धोका उद्‌भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यामुळे कारागृहातील कैद्यांना अद्याप लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आलेला नाही. हा दुसरा व पहिल्या लसीचा डोस उपलब्ध व्हावा यासाठी कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. पण लस लवकरच मिळेल, इतकेच त्यांना आश्वासन मिळत आहे.

दीड महिन्यात एकही बंदी कोरोना पॉझिटिव्ह नाही

गेल्या दीड वर्षात कळंबा कारागृहात व आपत्कालीन कारागृहात सुमारे ८० हून अधिक बंदींना कोरोनाची लागण झाली होती. सध्या सर्व बंदीजन कोरोनामुक्त आहेत. गेल्या दीड महिन्यात एकाही बंदीला कोरोनाची लागण झालेली नाही. पण कोरोना प्रतिबंधक लस वेळेवर उपलब्ध झाली नाही, तर रोखलेला कोरोनाचा धोका उद्‌भवण्याची शक्यता आहे.

पॅरोल, जामिनावर बंदीजन बाहेर

वर्षे : शिक्षा झालेले : न्यायालयीन बंदी

२०२० : २५० : २२५

२०२१ : ७० : १५०

कोट...

बंदींना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे, पण लसीकरणाचे डोस शासनाकडून वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक बंदीजन लसीकरणापासून वंचित आहेत. लस उपलब्ध होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.

- चंद्रमणी इंदूरकर, कारागृह अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर

Web Title: 50% inmates of Kalamba jail deprived of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.