जिल्ह्यात ४७० बिनकामाच्या सहकारी संस्था

By Admin | Updated: September 22, 2015 00:09 IST2015-09-21T23:08:06+5:302015-09-22T00:09:59+5:30

सर्वेक्षण अंतिम टप्प्यात : आणखी चारशे संस्थांची होणार तपासणी, अनेक संस्था अवसायनात जाणार

470 co-operative organizations of the district | जिल्ह्यात ४७० बिनकामाच्या सहकारी संस्था

जिल्ह्यात ४७० बिनकामाच्या सहकारी संस्था

सांगली : केवळ कागदोपत्री असलेल्या, बंद असलेल्या व कोणतेही काम न करणाऱ्या सहकारी संस्था अवसायनात काढून त्यांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया १ जुलैपासून सुरू झाली असून, आजवर झालेल्या सर्वेक्षणातून तब्बल ४७0 बिनकामाच्या संस्था आढळल्या आहेत. या सर्व संस्था अवसायनात काढून त्यांची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक यांनी दिलेल्या आदेशानुसार १ जुलैपासून सर्वेक्षण मोहीम सुरू झाली. ३१ डिसेंबरपर्यंत सर्वेक्षणाची मुदत होती. तत्पूर्वीच अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सांगली जिल्ह्यात मोहीम राबविण्यात आल्यामुळे मुदतीपूर्वीच सर्वेक्षण संपणार आहे. आजअखेर ८९ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून, उर्वरित कामही येत्या ३0 सप्टेंबरपर्यंत संपणार आहे. अजून ४०० संस्थांचे सर्वेक्षण बाकी आहे.
बिनकामाच्या सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करून उर्वरित संस्थांच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष देण्याच्यादृष्टीने ही मोहीम सहकार विभागाने हाती घेतली आहे. मोहिमेत ज्या सहकारी संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येणार नाहीत किंवा ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही, त्यांच्यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून त्या संस्था बंद असल्याबाबत खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार अशा संस्थांबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. पूर्णपणे बंद असलेल्या व कार्यस्थगित संस्था अवसायनात घेण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा उपनिबंधकांनी दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांची संख्या मोठी आहे. कृषी बँका, कृषी पतसंस्था, नागरी बँका, नागरी पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, पणन संस्था, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, दूध संस्था, सूतगिरण्या, उपसा जलसिंचन संस्था, ग्राहक भांडारे, गृहनिर्माण संस्था, कामगार कंत्राटदार संस्था अशा अनेक प्रकारच्या सहकारी संस्था अस्तित्वात आहेत. अनेक सहकारी संस्थांची नावे शासकीय दफ्तरी नोंद असली तरी, प्रत्यक्षात त्या पत्त्यावर या संस्था अस्तित्वात नाहीत. काही संस्था केवळ कागदोपत्री जिवंत आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांची गर्दी कागदोपत्री मोठी दिसत आहे.नव्या मोहिमेनंतर आता सुस्थितीत असलेल्याच सहकारी संस्था कागदोपत्री व प्रत्यक्षात जिवंत राहतील. उर्वरित अनेक संस्था आता अवसायनात काढल्या जाणार असून, त्यांची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. (प्रतिनिधी)


मिरज तालुक्यात सर्वाधिक बंद संस्था
संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक बंद असलेल्या सहकारी संस्था मिरज तालुक्यात आढळल्या आहेत. जवळपास साडेतीनशे संस्था याठिकाणी आढळून आल्या आहेत. कवठेमहांकाळ तालुक्याचाही सर्व्हे पूर्ण झाला आहे. येत्या महिनाअखेर मोहीम पूर्ण होणार असून, त्यानंतर तालुकानिहाय बिनकामाच्या सहकारी संस्थांची यादी तयार करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील उर्वरित ४00 सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाचे काम राहिले आहे. तेसुद्धा येत्या काही दिवसात संपणार आहे. यातील बहुतांश सहकारी संस्था बंद असण्याची शक्यता आहे. मिरज तालुक्यात सर्वात जास्त संस्था आहेत. सर्वेक्षणाच्या मोहिमेचा विचार केला, तर संपूर्ण राज्यात सर्वात गतीने व शिस्तबद्ध पद्धतीने सांगली जिल्ह्यातील काम पूर्ण झाले आहे.

Web Title: 470 co-operative organizations of the district