निपुण कोरे, अजित नरकेंसह ४६ जणांचे अर्ज अवैध
By Admin | Updated: April 11, 2015 00:09 IST2015-04-11T00:06:31+5:302015-04-11T00:09:41+5:30
जिल्हा बॅँक निवडणूक : दोन वर्षांपूर्वीचे सभासद अटीचा फटका

निपुण कोरे, अजित नरकेंसह ४६ जणांचे अर्ज अवैध
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ४६ अर्ज अवैध, तर ३५३ अर्ज वैध ठरले. संस्थेच्या नोंदणीपूर्व सभासद, दोन वर्षांपूर्वीचे सभासद नाही, थकबाकीदार, आदी कारणांनी हे अर्ज अवैध ठरविले. वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे व ‘कुंभी’ बँकेचे अध्यक्ष अजित नरके हे दोन वर्षांपूर्वीची सभासदत्वाची अट पूर्ण न करू शकल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले.
जिल्हा बँकेसाठी ३९९ जणांच्या अर्जाची गुरुवारी (दि. ९) निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम यांनी छाननी केली. विकास संस्था गटात भुदरगड तालुक्यातून के. जी. नांदेकर हे २३ एप्रिल २०१४ ला सभासद झाल्याने पोटनियमांनुसार दोन वर्षांचा कालावधी पूर्ण न शकल्याने अर्ज अवैध ठरला. मनिषा हंबीरराव पाटील, निपुण कोरे, अजित नरके यांचे अर्ज कालावधी पूर्ण केला नसल्याने अपात्र ठरविले. विनायकराव पाटील हे शिवाजी बँकेचे थकबाकीदार जामीनदार तर युवराज पाटील हे मल्लिकार्जुन संस्थेचे थकबाकीदार व रणवीरसिंह गायकवाड हे कोडोली व्यापारी पतसंस्थेचे थकबाकीदार जामीनदार असल्याने अर्ज अवैध ठरले.
पणन प्रक्रिया गटातील अनिल मादनाईक यांच्या संस्थेचे लेखापरीक्षण पूर्ण नाही म्हणून अपात्र ठरला. दूध, पाणीपुरवठा गटातून रणजितसिंह पाटील, किशोर पाटील, भाग्येशराव कुपेकर यांचे अर्ज अवैध ठरले. (प्रतिनिधी)