४५ ग्रामपंचायती बिनविरोध
By Admin | Updated: July 16, 2015 01:01 IST2015-07-16T01:01:47+5:302015-07-16T01:01:47+5:30
निर्णायक घडामोडी : उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये बहुरंगी लढती होणार ?

४५ ग्रामपंचायती बिनविरोध
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या ४१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी सुमारे ४५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित ग्रामपंचायतीत स्थानिक गटांतर्गत दुरंगी, तिरंगी व बहुरंगी निवडणुका होणार आहेत. दोन आठवड्यांपासून ग्रामपंचायती निवडणुकांच्या निमित्ताने जिल्ह्यातील वातावरण तापले असून, बुधवारी माघारीच्या दिवशी निर्णायक घडामोडीत ४५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. हातकणंगले तालुक्यातील दुर्गेवाडी तर करवीर तालुक्यातील वाडीपीर ग्रामपंचायत बिनविरोध झाली. शाहूवाडी तालुक्यातील पेरीड, शिराळे तर्फ मलकापूर, नेर्ले, वडगाव, कांडवण, मोळवडे, पेंडागळे, सोनुर्ले या आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. पन्हाळा तालुक्यातील वारनूळ, हारपवडे, म्हाळुंगे तर्फ बोरगाव या तीन, तर शिरोळ तालुक्यातील बुबनाळ ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.
कागल तालुक्यात अर्जुनी, हळवडे, बेनिक्रे, शंकरवाडी, बेलेवाडी मासा या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. आजरा तालुक्यातील मलिग्रे, यरंडोळ, चव्हाणवाडी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. राधानगरी तालुक्यात सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. गडहिंग्लज तालुक्यातील मुंगूरवाडी, दुगूनवाडी, इदरगुच्ची, शिंदेवाडी या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. भुदरगड तालुक्यातील ४५ ग्रामपंचयातींपैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी, पाटणे, माळेवाडी, बुक्कीहाळ व मुगळी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. (प्रतिनिधी)
बुबनाळ : टोकाच्या राजकीय व जातीय संघर्षासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या शिरोळ तालुक्यातील बुबनाळ गावाने ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून सर्व अकरा जागांवर महिलांना संधी देत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महिला सक्षमीकरणाला बळकटी देऊन जातीय व सामाजिक सलोख्याचा नवा संदेश देण्याचे काम बुबनाळ गावाने केले आहे.
बुबनाळ हे चार हजार लोकवस्तीचे शिरोळ तालुक्यातील सधन गाव आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे. गावात सहकारी पाणीपुरवठा संस्था, सेवा संस्था, पतसंस्था व दूध संस्थेच्या माध्यमातून सहकाराचे जाळे विणलेले. मात्र, येथील सत्तासंघर्ष, राजकीय इर्षा पराकोटीला पोहोचलेला होता. २०१० साली गावाने पहिल्यांदा एकी दाखवत अकरा पैकी दहा जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आणले होते. एका उमेदवारासाठी निवडणूक लागली होती. मात्र, २०१५च्या पंचवार्षिक निवडणुकीत शंभर टक्के बिनविरोध करण्यात यश मिळवले असून, बुबनाळ गावाचा हा आदर्श जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आदर्शवत ठरला आहे. पुरुषांसाठी पाच जागा असूनदेखील सर्व जागांवर महिलांना संधी देऊन महिला सबलीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सर्व जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
बिनविरोध निवड झालेले उमेदवार - रोहिणी उर्फ सोनाली शहापुरे, त्रिशला कुंभोजे, सुजाता शहापुरे, रोशनबी बैरागदार, पुष्पलता ऐनापुरे, उल्फतबी मकानदार, पूनम कबाडे, अर्चना मालगावे, आसमा जमादार, त्रिशला निडगुंदे, स्नेहल मांजरे. बिनविरोध निवडीसाठी गावातील शरद कारखान्याचे संचालक धनपाल मरजे, जवाहर कारखान्याचे संचालक सुकुमार किनिंगे, सुरेश शहापुरे, राजाराम हेगाण्णा, नाभिराज निडगुंदे, बापूसो ऐनापुरे, धरणेंद्रकुमार मरजे, सरपंच विद्याधर मरजे, सुभाष किनिंगे, नाभिराज मरजे, अजित शहापुरे, कलंदर मकानदार, संजय मांजरे, शब्बीर मकानदार, जगन्नाथ जाधव, सुभाष शहापुरे, धनपाल कबाडे, सुरेश मरजे, गौतम किनिंगे, पवन मरजे, संजय केरिपाळे यांचे विशेष प्रयत्न लाभले. बिनविरोध निवडीनंतर मंगळवारी शिरोळ तहसील कार्यालय आवारात नूतन सदस्यांसह समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.