महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ४३ कार्यकर्त्यांना जामीन
By Admin | Updated: November 9, 2016 01:30 IST2016-11-09T01:26:56+5:302016-11-09T01:30:15+5:30
पोलिस प्रशासनाने बेळगाव आणि परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ४३ कार्यकर्त्यांना जामीन
बेळगाव : काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झाल्याच्या रागातून कर्नाटक पोलिसांनी अटक केलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ४३ कार्यकर्त्यांना मंगळवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, कारागृहातून त्यांची रात्री ९ च्या सुमारास सुटका करण्यात आली.
पोलिस प्रशासनाने बेळगाव आणि परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी पोलिस आयुक्तांच्या नोटिसीला वकील महेश बिर्जे यांच्यामार्फत उत्तर दिले असून, त्यामध्ये कोणत्याही नियमांचा भंग झाला नसल्याचे नमूद केले आहे.
सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात सामील केल्याच्या निषेधार्थ बेळगाव येथे मंगळवार दि. १ नोव्हेंबर रोजी काळ्या दिनाची फेरी काढली होती.
या फेरीत मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते. बुधवारपासून पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या घरात घुसून धरपकड सुरूकेली होती. कार्यकर्त्यांना जामीन मिळण्यास विलंब व्हावा म्हणून, पोलिसांनी त्यांना उशिरा हजर करणे, आदी सारे मार्ग अवलंबले होते. त्यामुळे जामीन अर्जावर सुनावणी होऊन विलंब होत असल्यामुळे जामीन मिळून कार्यकर्ते बाहेर केव्हा येतात याकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागले होते.
मंगळवारी या कार्यकर्त्यांना जामीन मिळाला. रात्री ९ च्या सुमारास कारागृहातून सुटका केली. जामिनासाठी अॅड. सुधीर चव्हाण, महेश बिर्जे, अमर येळ्ळूरकर, शामसुंदर पत्तार, बाळू चौगुले आणि अन्य वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली.