४० ‘सीसीटीव्ही’तून होणार निगराणी
By Admin | Updated: July 3, 2016 00:59 IST2016-07-03T00:59:26+5:302016-07-03T00:59:26+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : अमित सैनी यांच्याकडून पाहणी; ठिकाणांची निश्चिती; २४ लाख ७८ हजारांची तरतूद

४० ‘सीसीटीव्ही’तून होणार निगराणी
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नवीन इमारती आता सुमारे ४० ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २४ लाख ७८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शनिवारी पाहणी करून कॅमेरे लावण्याची ठिकाणे निश्चित केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर यापूर्वीच ‘सीसीटीव्ही’च्या नियंत्रणाखाली आला आहे. जुन्या इमारतीमध्ये जवळपास १२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे कार्यालय येथे हे कॅमेरे आहेत; परंतु दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये अद्याप कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. दररोज होणारी आंदोलने, कामानिमित्त येणाऱ्या लोकांची लक्षणीय संख्या यांमुळे या इमारतीसह परिसरात ‘सीसीटीव्ही’ची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली होती. जिल्हाधिकारीहे समितीचे सचिव असल्याने त्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन २४ लाख ७८ हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.
शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, नायब तहसीलदार प्रकाश दगडे, प्रदीप कदम यांच्यासमवेत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांसह जिल्हा नियोजन कार्यालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय, जिल्हा खनिकर्म कार्यालय, रोजगार हमी योजना कार्यालय, महसूल कार्यालय, भूसंपादन कार्यालय, करमणूक कर कार्यालय, नगरपालिका प्रशासन कार्यालय, आदी ठिकाणांची पाहणी केली. कोणत्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे, याची पाहणी करून ती निश्चित करण्यात आली आहेत. वरील कार्यालयांसह जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय, त्यांच्या कार्यालयासमोरील खुला पॅसेज, मुख्य प्रवेशद्वार, छत्रपती ताराराणी हॉल, नवीन कार्यालयाच्या बेसमेंटमधील पार्किंग, इमारतींमधील जिने, आदी ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
चौकी कुलूपबंद का ?
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारंवार होणारी आंदोलने, आत्मदहनाचे प्रकार, हिंसक आंदोलनांमुळे होणारे प्रशासनाचे नुकसान या पार्श्वभूमीवर परिसरात कायमस्वरूपी पोलिस चौकी जिल्हा प्रशासनाने मंजूर करून घेतली आहे. शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीतून ही चौकीही सुटली नाही. चौकीला कुलूप दिसल्यावर बंदोबस्तावरील पोलिसांकडे याबाबत त्यांनी विचारणा केली. येथून पुढे येथे कायमस्वरूपी पोलिस कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, अशा सूचना केल्या. तसेच जिल्हा नियोजन कार्यालयापाठीमागे असणारा कचरा लवकरात लवकर उचलून परिसर स्वच्छ करून घ्यावा, अशा सूचनाही संंबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.