३७ हजार रेशनकार्ड बोगस
By Admin | Updated: July 17, 2017 00:33 IST2017-07-17T00:33:03+5:302017-07-17T00:33:03+5:30
३७ हजार रेशनकार्ड बोगस

३७ हजार रेशनकार्ड बोगस
दत्ता बिडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हातकणंगले : तालुक्यामध्ये १ लाख ४ हजार रेशनकार्ड कुटुंबापैकी फक्त ६३ हजार कुटुंबांना धान्यपुरवठा सुरू असून जवळपास ३७ हजार रेशनकार्ड बोगस असण्याची शक्यता आहे. पुरवठा विभाग, धान्य दुकानदार आणि बोगस रेशनकार्ड काढून देणारे एजंट यांची साखळी या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रेशनच्या धान्य मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे तालुक्यामध्ये ३७ हजार रेशनकार्डधारकांना धान्याचा पुरवठाच होत नाही. यामुळे रेशन धान्यसाठी शासनाने सुरू केलेली बायोमेट्रीक यंत्रणा कुचकामी ठरत आहे.
तालुका अडीच ब्लॉकचा असून, दोन विधानसभा या तालुक्यामध्ये येत आहेत. निलेवाडी - पारगावपासून रांगोळी - रेंदाळपर्यंत हा तालुका विस्तारला असून, सुशिक्षित कुटुंबाची संख्याही मोठी आहे. तालुक्यामध्ये एकूण १ लाख ४ हजार ५१ इतकी रेशन धान्य कुटुंब संख्या आहे. यापैकी अंत्योदय १४९९ बी.पी.एल. (दारिद्र्यरेषा) १७५१६ तर केशरी ४४६८५ अशी ६३ हजार ६०० इतकी संख्या तालुका पुरवठा विभागाकडे नोंद आहे. तर ३६ हजार ४०० इतकी रेशनकार्ड वितरीत झाली आहेत, मात्र त्यांचे धान्य कुटुंबांना मिळत नाही.
रेशनकार्ड विभक्त केले किंवा या तालुक्यामधून दुसऱ्या तालुक्यामध्ये स्थलांतर झालेल्या कुटुंबांना रेशनधान्य दिलेच जात नाही. लग्न होऊन मुलगी सासरी गेल्यानंतर तिचे नाव एखाद्या कुटुंबाने वाढवून घेतले किंवा लहान मुलाची नावे रेशनकार्ड मध्ये वाढवून घेतली तरी रेशनधान्य दुकानदार या वाढीव युनिटचे धान्य
देत नाही. पुरवठा विभागाकडून धान्य आले नाही, मी कोठून देणार, अशी भाषा वापरून कार्डधारकाला गप्प करतो. पुरवठा विभागाने नाव वाढवून दिलेले असते. विभक्त कार्ड किंवा स्थलांतर कार्डचा कोटा दुकानदाराला वाढवून दिलेला असताना दुकानदार यामध्ये ढपला पाडून कार्डधारकाला मग्रुरीची आणि टोकाची भाषा वापरत असल्यामुळे रेशन धान्यासाठी दररोज वादावादीचे प्रसंग घडत आहेत.
शासनाने धान्य पुरवठ्यामधील गैरकारभार रोखण्यासाठी बायोमेट्रीक मिशनवर थम्पची सुविधा सुरु केली असली तरी ती कुचकामी ठरत आहे. रेशन धान्य दुकानदार कार्डधारकांना फसविण्याचे प्रकार वाढत चालले आहेत, यावर निर्बंध घालण्याची गरज आहे . (पूर्वार्ध)
तालुका पुरवठा विभाग प्रत्येक महिन्याला रेशन धान्य दुकानदार यांच्याकडून धान्य वाटपासाठी दुकानदारांना दिलेल्या कार्डकोट्याप्रमाणे शासकीय चलने रक्कम भरून घेऊन धान्य दुकानदाराला दुकानापर्यंत पोहोच करत असते, मात्र दुकानदार शासनाकडून धान्य मिळूनही रेशनकार्डधारकांना धान्य पुरवठा करत नाही. ग्रामीण भागामध्ये दोन, चार दिवस हेलपाटे मारल्यानंतर धान्य दिले जाते.