विदेशी मद्यासह ३६ लाखांचा माल जप्त
By Admin | Updated: June 1, 2015 00:12 IST2015-05-31T22:57:43+5:302015-06-01T00:12:51+5:30
टेम्पो पकडला : राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाची कारवाई

विदेशी मद्यासह ३६ लाखांचा माल जप्त
कोल्हापूर : गोव्याहून पुण्याकडे प्लास्टिक पाईप घेऊन जाणाऱ्या टेम्पोतून विदेशी मद्याचे साडेपाचशे बॉक्स पुणे-बंगलोर महामार्गावरील सरनोबतवाडीजवळ राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने रविवारी सकाळी पकडले.
याप्रकरणी टेम्पोचालक पाँचू हरिजन (वय २४) व किन्नर गौतम (३० दोघे रा. डेरामपूर, उत्तर प्रदेश) यांना पकडून विदेशी मद्यासह सुमारे ३६ लाख २५ हजारांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला, तर संशयित जितेंद्र रिजवानी (रा. उल्हासनगर, ठाणे) याचा शोध सुरू आहे.याबाबत पथकाने सांगितले की, गोव्याहून पुण्याकडे रविवारी सकाळी सातारा पासिंगचा (एम.एच. ११ एएल २१५९) टेम्पो पुणे-बंगलोर महामार्गावरून निघाला होता. यावेळी भरारी पथकाने हा टेम्पो अडविला. त्यामध्ये प्लास्टिकच्या पाईप व त्यावर ताडपत्री झाकली होती. पथकाने संपूर्ण टेम्पोची तपासणी केली असता या प्लास्टिक पाईपखाली विदेशी मद्याचे बॉक्स आढळले. त्यानंतर टेम्पो रंकाळा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणला. संशयित टेम्पोचालक पाचू हरिजन व केशरीलाल गौतम यांनी हे विदेशी मद्य गोव्यातून पुण्याला नेत असल्याचे पथकाला सांगितले. या टेम्पोच्या बॉक्समधील ७५० मिलिमीटरच्या नऊ हजार तर १८० मिलिलिटरच्या सात हजार २०० बाटल्या अशा एकूण १६ हजार २०० बाटल्या सुमारे २७ लाख २६ हजार ४०० रुपयांचा विदेशी मद्यासह टेम्पो असा ३६ लाख २५ हजार ३८० रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई कोल्हापूर विभागीय उपायुक्त संगीता दरेकर यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक बी. के. जाधव, दुय्यम निरीक्षक देवरे व महाराष्ट्र भरारी पथकाने केली.