दोघांकडून ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By Admin | Updated: September 2, 2015 23:38 IST2015-09-02T23:02:59+5:302015-09-02T23:38:51+5:30
चंदगड पोलिसांची कारवाई : अठरा घरफोड्यांची कबुली

दोघांकडून ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा सीमाभागात घरफोड्यांचा धुमाकूळ घालणाऱ्या दोघांना चंदगड पोलिसांनी अटक केली होती. प्रकाश विनायक पाटील (वय ३०, रा. झरीवाडा सतेरी-गोवा), अजित शिवराई धनगर (२५, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी कोल्हापूर-बेळगाव सीमाभागातील घरफोडीच्या १८ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून एक किलो साडेसहा तोळे सोन्याचे दागिने, चार किलो चांदी, दोन आलिशान कार, दोन मोटारसायकली, फर्निचरचे साहित्य असा सुमारे ३६ लाख ४३ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा सीमाभागात गेल्या वर्षभरापासून दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते. अशा पद्धतीने घरफोडी करणाऱ्यांची माहिती घेताना चंदगड पोलिसांची दमछाक झाली होती. दरम्यान, पोलीस निरीक्षक अंगद जाधवर व पोलीस उपनिरीक्षक शरद माळी यांनी कर्नाटक, गोवा व कोल्हापूर जिल्ह्यांतील घरफोड्यांची सखोल माहिती घेतली असता बेळगावचा मूळ रहिवासी परंतु गोवा येथे वास्तव्यास असणारा प्रकाश पाटील व त्याचा साथीदार राजू चारी यांची नावे पुढे आली. दोघांच्या हालचालींवर लक्ष ठेवून प्रकाश पाटीलला व त्याचा तिसरा साथीदार अजय धनगर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोड्यांची कबुली दिली. या चोरट्यांनी पोलिसांच्याही घरी डल्ला मारल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या दोघांचा तिसरा साथीदार राजू सलवराज चारी हा पसार आहे.
रात्री नव्हे, दिवसा लक्ष
गडहिंग्लज, चंदगड, नेसरी परिसरात घरे लांब-लांब आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याने घरातील सर्वच लोक दिवसा शेतामध्ये घराला कुलूप लावून जात असतात. त्यामुळे संशयित दिवसा कोणते घर बंद आहे, याचा अंदाज घेत असत. त्यानंतर त्या घराच्या पाठीमागील दरवाजाची बिजागरी तोडून आतमध्ये प्रवेश करीत असत.
आलिशान राहणीमान
प्रकाश पाटील व राजू चारी हे दोघे गोव्यामध्ये आलिशान फ्लॅटमध्ये कुटुंबासह राहतात. दिमतीला मोटारी व रुबाबदार राहणीमान असल्याने ते चोर असल्याची शंका कुणालाच येत नव्हती. चोरीच्या पैशातून त्यांनी मोटारी, दुचाकी, सोफासेट, खुर्च्या खरेदी केल्या होत्या. या सर्व साहित्यासह सोन्या-चांदीचे दागिने, विदेशी चलनाच्या नोटा, पासपोर्ट, धनादेश, हे सर्व हस्तगत केले.