उपमहापौरांसह ३६ नगरसेवकांना अटक
By Admin | Updated: March 12, 2015 23:51 IST2015-03-12T23:21:35+5:302015-03-12T23:51:40+5:30
कोल्हापुरातील घटना : महापौरांचे वाहन अडविण्याचे प्रकरण भोवले

उपमहापौरांसह ३६ नगरसेवकांना अटक
कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांचे चारचाकी वाहन अडविण्याचा प्रयत्न करून त्यांना अटकाव करणारे संशयित उपमहापौर मोहन गोंजारे, यांच्यासह ३६ नगरसेवक स्वत:हून गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास लक्ष्मीपुरी पोलिसांत हजर झाले. त्यानंतर या सर्वांना अटक दाखवून कसबा बावडा येथील प्रथमवर्ग न्यायाधीश जे. एम. चव्हाण यांच्यासमोर हजर केले. यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे ऐकून न्यायाधीश चव्हाण यांनी प्रत्येकी ५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. महापौर माळवी राजीनामा देत नसल्याच्या कारणावरून महापालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर त्या ‘जनता दरबारा’साठी जात असताना उपमहापौरांसह नगरसेवकांनी त्यांचे चारचाकी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांच्या वाहनावर हल्लाही करण्याचा प्रयत्न केला होता. महापौर माळवी यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी उपमहापौरांसह ३६ नगरसेवकांवर बेकायदा जमाव करून जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश झुगारून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व नगरसेवकांना नोटिसा पाठवून शुक्रवार (दि. १३)पर्यंत म्हणणे सादर करण्याची सूचना दिली होती; परंतु म्हणणे सादर केले नाही. गुरुवारी दीडच्या सुमारास उपमहापौरांसह ३६ नगरसेवक पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर हजर झाले. त्यानंतर या सर्वांना गोडसे यांनी म्हणणे सादर करण्यास सांगितले. त्यावर त्यांनी आम्ही न्यायालयात म्हणणे सादर करू, अशी भूमिका घेतल्याने सर्वांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायाधीश चव्हाण यांनी या सर्वांची वैयक्तिक जातमुचक्यावर सुटका केली.