‘भोगावती’वर ३३१ कोटींचे कर्ज
By Admin | Updated: June 12, 2016 01:41 IST2016-06-12T01:41:07+5:302016-06-12T01:41:07+5:30
विश्वनाथ पाटील : चुकीचा ताळेबंद दाखविला

‘भोगावती’वर ३३१ कोटींचे कर्ज
राशिवडे : भोगावती सहकारी साखर कारखान्यावर ३३१ कोटींचे कर्ज असून, चुकीच्या ताळेबंदाने तोटा कमी दाखविण्यात आला आहे. ढिसाळ नियोजनाने सभासदांना १२ महिन्यांची साखर मिळालेली नाही, असा आरोप काँग्रेसचे माजी संचालक विश्वनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. ते मागील संचालक मंडळातील एकमेव विरोधी संचालक असून, त्यांच्या आरोपाने ‘भोगावती’वर नेमके कर्ज किती यावरून खळबळ उडाली आहे.
‘भोगावती’ची आर्थिक स्थिती वाईट झाल्याने ताळेबंदात संचित तोटा दिसू लागल्याने कोणतीही बँक को-जनला आर्थिक पुरवठा करणार नाही, म्हणूनच संचित तोटा कमी दाखवून कर्ज कमी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. २०१४-१५ च्या हंगामात ६४ कोटींचा तोटा झाला आहे; तर या गळीत हंगामात १४ कोटी ३० लाखांचा तोटा होणार आहे.
‘भोगावती’वर ३३१ कोटींचा कर्जाचा डोंगर असून, साखरेवरील कर्ज सोडून ८९ कोटी २६ लाख १६ हजारांचे कर्ज, ठेवी १४ कोटी ७९ लाख १२ हजार ३२६ रुपये, इतर देणी १९ कोटी ७५ लाख २५ हजार ३०० रुपये असून, साखर तारण कर्ज १३६ कोटींचे आहे. कारखान्याकडे १६४ कोटींची साखर शिल्लक आहे. को-जनला कर्ज मिळविण्यासाठी ८२ कोटींचा तोटा मुरविण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसच्या सत्ता काळात ३५ कोटी ८० लाख संचित तोटा, २८ कोटींचे कर्ज, ठेवी १२ कोटी ६० लाख, चालू देणी २२ कोटी ९८ लाख होती. याउलट राष्ट्रवादी व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकाळात ८२ कोटी ९३ लाख संचित तोटा, ८९ कोटी २६ लाखांचे कर्ज, चालू देणी, साखर तारण असे ३३१ कोटींच्या कर्जाच्या विळख्यात ‘भोगावती’ अडकल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.