३१ डिसेंबरला झाले आंदोलनाला ३१ दिवस

By Admin | Updated: January 2, 2015 00:58 IST2015-01-02T00:33:14+5:302015-01-02T00:58:58+5:30

‘मुक्ती संघर्ष’चे प्रश्न : आजरा तहसील कार्यालयासमोर ‘दाभिल’ ग्रामस्थांचे आंदोलन

On 31st December the agitation was 31 days | ३१ डिसेंबरला झाले आंदोलनाला ३१ दिवस

३१ डिसेंबरला झाले आंदोलनाला ३१ दिवस

आजरा : दाभिल येथील स्वस्त धान्य दुकानदारासह पोलीसपाटील बदलावा, साळगाव येथील भूमीहिन बेघर वस्तीकडे जाणारा रस्ता तयार करून मिळावा, यासह विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आजरा तहसील कार्यालयासमोर गेले ३१ दिवस ठिय्या आंदोलन मुक्ती संघर्ष समितीच्यावतीने सुरू आहे. आंदोलनाला तब्बल ३१ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असला तरीही अद्याप आंदोलकांनी उपस्थित केलेले प्रश्न अनुत्तरितच आहेत.
दाभिल येथील रास्त धान्य दुकानदाराच्या परवान्याचा प्रश्न गेले वर्षभर ऐरणीवर आहे. रास्त धान्य दुकानदाराबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी असल्याने या धान्य दुकानाचा परवाना रद्द करून तो दुसऱ्याला द्यावा, अशी मागणी ‘मुक्ती संघर्ष’ने करत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. स्थानिक ‘तहसील’च्या पातळीवर याची रितसर चौकशी करीत तहसीलदारांनी आपली भूमिका पार पाडली आहे.
आजरा तहसील कार्यालय ते विभागीय आयुक्त, व्हाया जिल्हा पुरवठा अधिकारी असा या ‘दाभिल’ प्रकरणाचा प्रवास सुरू आहे. याच्या जोडीला साळगाव येथील बेघर वसाहतीच्या रस्त्याचा प्रश्न, कोळींद्रे, मासेवाडी येथील ग्रामपंचायत अखत्यारितील प्रश्न, असे प्रश्न घेऊन हे आंदोलन सुरू आहे.
यातील कोळींद्रे व मासेवाडी ग्रामपंचायतीसंदर्भातील प्रश्न आता मागे पडले आहेत. मुख्य प्रश्न आहे तो ‘दाभिल’चा. ‘दाभिल’बाबत उपायुक्तांनी दुकानदार यादव यांना क्लीन चिट देत परवाना कायम ठेवण्याचा आदेश केला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाची व्याप्ती वाढविली आहे. एकीकडे ‘दाभिल’ प्रकरणाबाबत उपायुक्त पातळीवर चर्चा, तर दुसरीकडे ‘साळगाव’प्रकरणी गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याशी बैठका, असा प्रकार सुरू आहे. यामुळे आंदोलनाचा कालावधी वाढत आहे. सध्यातरी याबाबत समाधानकारक तोडगा दिसत नाही.
तहसीलदारांनी आपल्या पातळीवरच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आता उपविभागीय अधिकारी व उपायुक्तांच्या निर्णयावरच आंदोलनाची दिशा ठरणार आहे. (प्रतिनिधी)


९ रोजी मोर्चा : सावंत
जयश्री विठोबा यादव यांच्या नावे दुकान असताना विठोबा यादव हे बोगस सह्या करून स्वत: दुकान चालवत आहेत. याबाबत विठोबा यादव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ९ जानेवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कॉ. संग्राम सावंत यांनी दिली.

Web Title: On 31st December the agitation was 31 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.