शेती पाणी व्यवस्थापनासाठी ३११ कोटींचा निधी मंजूर

By Admin | Updated: July 18, 2014 23:25 IST2014-07-18T23:19:20+5:302014-07-18T23:25:25+5:30

राज्य शासनाकडून मंजूरी

311 crores sanctioned for agricultural water management | शेती पाणी व्यवस्थापनासाठी ३११ कोटींचा निधी मंजूर

शेती पाणी व्यवस्थापनासाठी ३११ कोटींचा निधी मंजूर


कोपार्डे : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेती पाणी व्यवस्थापनासाठी ३११ कोटी १३ लाख रुपयांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत पाणी व्यवस्थापनामधील ठिबक, तुषार सिंचन, पाणी उपयोग आणि वितरण व्यवस्था, दुय्यम साठवणूक निचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित करण्याबरोबर काटकसरीने पाणी वापर क्षमता वृद्धीवर भर देण्यात येणार आहे. हा निधी २०१४/१५ या वर्षासाठी देण्यात आला आहे.
शाश्वत शेतीसाठी पाणी व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने निधी देण्यात आला असून, केंद्राकडून २५० कोटी आणि राज्याकडून ६१ कोटी १३ लाख रुपये देण्यात आले आहेत. या निधीमधून सूक्ष्म सिंचनाखाली एका लाभार्थ्यांस पाच हेक्टर मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड करताना पंचायत राज्य संस्थांचा सहभाग घ्यावा, असे सुचविण्यात आले आहे, तर लाभार्थ्यांचे अनुदान थेट बँकेत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांमध्ये ५० टक्के अल्प व अत्यल्प भूधारक असावेत, असे संकेत देण्यात आले आहेत. त्यापैकी ३० टक्के महिला, अनुसूचित जातीमधील १६ आणि ८ टक्के अनुसूचित जमातीमधील असावेत. तसेच या योजनेची सर्व प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात यावी, सूक्ष्म सिंचनासाठी कमीत कमी २५ टक्के अनुदानाचा वापर पीक क्षेत्रासाठी करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: 311 crores sanctioned for agricultural water management