जिल्ह्यातील ३० हजार जणांना मिळाले १५०० रुपये आणि संपलेही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:25 IST2021-05-09T04:25:35+5:302021-05-09T04:25:35+5:30
नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये याप्रमाणे ...

जिल्ह्यातील ३० हजार जणांना मिळाले १५०० रुपये आणि संपलेही
नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये याप्रमाणे जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या ३२ हजार पैकी ३० हजार जणांच्या खात्यावर साडेचार कोटी रुपये जमा झाले आहेत. पंधरा दिवसांसाठीच्या लॉकडाऊनसाठी मिळालेले पैसे आता संपले असून, बांधकामे थांबल्याने कामगारांचे अर्थचक्रही ठप्प झाल्याने मदतीच्या दुसऱ्या हप्त्याकडे डोळे लागले आहेत.
पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर करताना, महाविकास आघाडी सरकारने पाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यात बांधकाम कामगारांचाही समावेश होता. कामगार आयुक्त कार्यालयाने मागीलवर्षी लॉकडाऊनच्या काळात ज्या कामगारांना दोन आणि तीन हजारांची मदत दोन टप्प्यात मिळाली होती, त्याच खात्यावर १५०० रुपयांचीही मदत वर्ग करण्याची कार्यवाही केली आहे. जिल्ह्यात दोन वर्षापूर्वी ९० हजार बांधकाम कामगारांची नाेंदणी करण्यात आली होती. तथापि नूतनीकरणाअभावी यातील निम्म्याहून जास्त खाती बंद पडली आहेत. केवळ ३२ हजार खातीच सक्रिय आहेत. या सक्रिय खातेदारांनाच शासनाच्या मदतीचा लाभ झाला असून, नूतनीकरण रखडलेले अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
चौकट
लॉकडाऊन वाढला, काम अन् मदत थांबली
लॉकडाऊनचा कालावधी वाढविला, काम सुरू ठेवण्याची सवलतही बंद केली; मग १५ दिवसांच्या लाॅकडाऊनसाठी दिलेली १५०० रुपयांची मदत पुरवायची कशी, याची विवंचना बांधकाम कामगारांना सतावू लागली आहे. त्यामुळे निदान महिनाभर कुटुंब जगविण्यासाठी आणखी पाच हजार रुपये खात्यावर वर्ग करावेत, अशी मागणी या कामगारांकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. राज्यस्तरावरील बांधकाम कामगार संघटना यासाठी आग्रही असून, मुख्यमंत्री कार्यालयाकडून कामगार विभागाकडे प्रस्ताव पाठविल्याचे लेखी पत्रही आले आहे.
प्रतिक्रिया
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ३२ हजार नोंदीत कामगारांपैकी ३० हजार कामगारांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. आता नोंदणीचे नूतनीकरण करणाऱ्या प्रस्तावांची छाननी सुरू आहे. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण झाल्यानंतर लाभ मिळालेल्यांचा आकडा वाढणार आहे.
संदेश आयरे,
सहआयुक्त, कामगार विभाग, कोल्हापूर
प्रतिक्रिया
लॉकडाऊन कधीपर्यंत चालणार, हे माहीत नसल्याने बांधकाम कामगारांची आबाळ होणार, हे लक्षात घेऊन आणखी ५ हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा करावेत, असे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याही कानावर घातले आहे. पूर्वी नोंद असलेले, पण मागील लाॅकडाऊन काळातील रक्कम मिळालेली नाही, अशा कामगारांची संख्या जास्त असल्याने त्यांनाही दीड हजारांच्या मदतीच्या कक्षेत आणणे गरजेचे आहे.
शिवाजी मगदूम,
बांधकाम कामगार संघटना
प्रतिक्रिया
शासनाने जाहीर केल्याप्रमाणे १५०० रुपये खात्यावर जमा झाले. लॉकडाऊनच्या काळात आम्हाला चांगला दिलासा मिळाला, पण आता लॉकडाऊन वाढला आहे, कामही बंद असल्याने आणखी मदत देण्याची गरज आहे.
आनंदा नलवडे, बांधकाम मजूर