३०० ‘दादा-भार्इं’हद्दपार होणार
By Admin | Updated: August 17, 2014 22:51 IST2014-08-17T22:41:04+5:302014-08-17T22:51:07+5:30
गणेशोत्सवासाठी कारवाई : गुंडांचे प्रस्ताव बनविण्याचे काम युद्धपातळीवर

३०० ‘दादा-भार्इं’हद्दपार होणार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गल्ली, चौकांत अथवा मंडळांच्या कट्ट्यांवर बसून ‘दादा-भार्इं’च्या जोरावर परिसरात दहशत माजविणाऱ्या सुमारे ३०० सराईत गुंडांना हद्दपार करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ज्या-त्या पोलीस ठाण्यांतर्गत हद्दपारीचे प्रस्ताव बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला ‘दादा-भार्इं’ना आपला गाशा गुंडाळून बाहेरील जिल्ह्णात प्रस्थान करावे लागणार आहे.
कोल्हापूर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन दक्ष आहे. एकापाठोपाठ एक आलेल्या गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी सणांबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या वाऱ्यामुळे जिल्ह्णातील वातावरण तापले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला गणेशोत्सवापासूनच सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. मंडळांना वर्गणीच्या नावाखाली मोठ्या स्वरूपात देणग्या देऊन त्यांना आपल्या बाजूने बसविण्याची व्यूहरचना इच्छुक उमेदवारांनी आखली आहे. सर्वजण साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करणार असल्याचे चित्र आहे.
शहरासह उपनगरातील राजेंद्रनगर, जवाहरनगर, यादवनगर, साळोखे पार्क, लक्षतीर्थ वसाहत, वारे वसाहत, विचारेमाळ, सदर बझार, शाहूपुरी, विक्रमनगर, दौलतनगर, मंगळवार पेठ, आदी ठिकाणी गुन्हेगारी टोळक्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. झोपडपट्टी रहिवाशांचे या परिसरात मोठे बस्तान असल्याने येथील संस्कृतीच गुन्हेगारी स्वरूपाची आहे. सुपारी घेऊन दिवसाढवळ्या चौकात, भररस्त्यावर मुडदे पाडण्यासाठी ते कधीच मागे पडत नाहीत. अशा काही गुन्हेगारांचा या गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे.
गणेशोत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.खबरदारी म्हणून पोलीस रेकॉर्डवर असणाऱ्या शहरासह उपनगरांतील सुमारे ३०० जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी उपविभागीय अधिकारी, करवीर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी केली आहे. त्यानुसार या सर्व गुन्हेगारांना २९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्णात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात येणार आहे.
गल्लीबोळांत, चौकात आणि परिसरात दहशत माजविणाऱ्या ‘दादा-भाई’ यांची यादी तयार करून त्यांना जिल्ह्णाबाहेर तडिपार करण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
- मनोजकुमार शर्मा
(पोलीस अधीक्षक)