करवीरमधील ३० शाळा गळक्या
By Admin | Updated: August 11, 2014 00:18 IST2014-08-10T23:48:09+5:302014-08-11T00:18:17+5:30
करवीर पंचायत मासिक सभा : सदस्यांचा आरोप; बांधकाम विभाग धारेवर

करवीरमधील ३० शाळा गळक्या
कसबा बावडा : करवीर तालुक्यातील ३० शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गळक्या शाळेमुळे मुले भिजायला लागली आहेत. बांधकाम विभागाने शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव न केल्यामुळे अशी परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत अनेक सदस्यांनी केला. अध्यक्षस्थानी सभापती दिलीप टिपुगडे होते.
गळक्या, मोडकळीस आलेल्या व काही ठिकाणी पडझड झालेल्या तालुक्यातील ३० शाळांची सद्य:स्थिती दर्शवणारे फोटो काढून व ठराव करून मुख्याध्यापकांच्या सहीने पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवले आहेत. हे प्रस्ताव एप्रिल महिन्यात पाठविले असूनही पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने त्याचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविले नाहीत. त्यामुळे शाळांची दुरुस्ती होऊ शकली नाही. त्यामुळे याचे पडसाद आज, शुक्रवारच्या सभेत उमटले. सभापती टिपुगडे यांनी या प्रकरणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी येत्या चार दिवसांत शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करून पाठवावेत, अशी सक्त ताकीदच अधिकाऱ्यांना दिली.
तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न अर्जुन पाटील यांनी उपस्थित केला. अतिरिक्त शिक्षकांना तालुक्यातच ठेवा. कारण येत्या काही महिन्यांत अनेक शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. त्यावेळी जिल्हा परिषदेकडे शिक्षक मागायची वेळ यायला नको. गटशिक्षण अधिकारी आर. जी. चौगले यांनी तालुक्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी वेळप्रसंगी कटू निर्णय घ्यावेत. सभागृह त्यांच्या पाठीशी असेल, असे तानाजी आंग्रे म्हणाले. योग्य निर्णय घेऊन शिक्षण विभागाचे काम चांगल्या प्रकारे केले जाईल, असे आश्वासन यावेळी गटशिक्षण अधिकारी आर. जी. चौगले यांनी दिले.
तालुक्यातील ८० टक्के अंगणवाड्यामधील इमारतीचा स्लॅब गळत असून, त्याची दुरुस्ती करावी. तसेच पाचगावमधील काही कॉलनीतील पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी स्मिता गवळी यांनी केली. या प्रश्नावर प्रत्येक सदस्याला शाळा, अंगणवाडी व दवाखाना दुरुस्ती यांसाठी ऐच्छिक निधी म्हणून २५ हजार रुपये दिले जातील, असे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.
मजुरांची उपलब्धता केल्यास मनरेगाची कामे त्वरित सुरू केली जातील, असे जिल्हा तक्रार निवारणचे अधिकारी डी. एस. पाटील यांनी स्पष्ट केले.