३० गावांना हवेत ‘पोलीसपाटील’
By Admin | Updated: December 26, 2014 00:52 IST2014-12-25T22:19:20+5:302014-12-26T00:52:50+5:30
आजरा तालुका : प्रतिष्ठेची ‘पाटीलकी’ रिक्तच

३० गावांना हवेत ‘पोलीसपाटील’
ज्योतीप्रसाद सावंत - आजरा तालुक्यातील तब्बल ३० गावांतील पोलीसपाटलांची पदे रिक्त असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, एखादी अपघाती घटना घडल्यास पोलीसपाटलांऐवजी स्थानिक मंडळीच पोलीसपाटलांची भूमिका बजावताना दिसतात. ग्रामीण भागातील ‘पाटील’की सांभाळण्यासाठी रिक्त पदे त्वरीत भरण्याची मागणी होत आहे.
आजरा तालुक्याकरिता एकूच ९४ पोलीसपाटलांची पदे मंजूर आहेत. पैकी ६४ जागांवर रितसर नेमणुका करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही ३० पदे रिक्तच आहेत. यातील काही पदे आरक्षणामुळे संबंधित प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध नसल्याने पोलीसपाटील सेवानिवृत्त झाल्याने तर काहींची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याने ते निलंबित झाल्याने रिक्त आहेत.
दर्डेवाडी, वाटगी, लाकूडवाडी, किटवडे, सरोळी, बेलेवाडी, देवर्डे, मलिग्रे, झुलपेवाडी, चव्हाणवाडी, जेऊर, सरोळी, कागिनवाडी, साळगाव, मडिलगे, हाजगोळी, हरपवडे, पेरणोली, लाटगाव, उत्तूर, विटे, मुमेवाडी, आवंढी, एरंडोळ, भादवण, हारूर, दाभिल, मोरेवाडी, खेडे, सुळेरान या गावांमध्ये पोलीसपाटीलच नाहीत.
पोलीसपाटील गावात नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणारी एखादी घटना संबंधित गावात घडल्यास पोलिसांपर्यंत सदर घटनेची माहिती समजण्यास बराच वेळ जातो आणि यामुळे पोलिसी तपास, कारवाई, खबरदारीचे उपाय याबाबत आवश्यक त्या हालचाली करण्यामध्ये अनेक अडचणी येतात.
गावपातळीवर अनेक दाखले हे पोलीसपाटलांकडून दिले जातात. गावात पोलीसपाटीलच नसल्याने ग्रामस्थांनाही स्थानिक पातळीवर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. देवर्डे, मडिलगे, सुळेरान या गावांना पोलीसपाटीलही नाही आणि ग्रामसेवकही नाही, अशी विचित्र परिस्थिती आहे.
मूळ ‘देसाई’ जगले
‘पाटील’ म्हणूनच
आजऱ्याचे ज्येष्ठ नेते कै. बळिरामजी देसाई यांनी अनेक वर्षे आजऱ्याची पोलीसपाटीलकी सांभाळली. यामुळे संपूर्ण तालुका त्यांना बळिराम पाटील या नावाने ओळखत असे. त्यांना स्वत:लाही या ‘पाटीलकी’चा अभिमान होता. याची जाहीररित्या ते कबुलीही देत.
त्यांची ओळख
‘पाटील’ म्हणूनच
ग्रामीण भागामध्ये पोलीसपाटील हे पद प्रतिष्ठेचे समजले जाते. पोलीस आणि पाटील हे दोन्हीही वजनदार शब्द पोलीसपाटील या पदात असल्याने आडनाव काहीही असले तरी नकळतपणे अनेक पोलीसपाटलांना ‘पाटील’ या नावाने संबोधले जाते.