दाम्पत्याकडून ३० लाखांचा गंडा
By Admin | Updated: July 8, 2014 00:59 IST2014-07-08T00:59:03+5:302014-07-08T00:59:33+5:30
दोघांनाही अटक : कमी पैशात शेअर्स देण्याचे आमिष

दाम्पत्याकडून ३० लाखांचा गंडा
कोल्हापूर : कमी पैशांत शेअर्स देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी ३० लाख ७४ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी दाम्पत्यास काल, रविवार अटक केली. संशयित स्वप्ना कपिल कुलकर्णी (वय २९), तिचा पती कपिल अनिल कुलकर्णी (३४, रा. श्रीदर्शन अपार्टमेंट, मंगळवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, फिर्यादी अक्षय अनंतराव कुंभोजकर (४६, रा. कुरुक्षेत्र अपार्टमेंट, ताराबाई पार्क) हे टेक्स्टाईल सल्लागार म्हणून काम करतात. व्यवसायातून त्यांची कपिल कुलकर्णी याच्याशी ओळख झाली. यावेळी कुलकर्णीने अनंतराठी प्रायव्हेट शेअर्स ब्रोकर कंपनीची उपशाखा आपण कोल्हापुरात पत्नी स्वप्नाच्या नावे काढली आहे. त्याचे काम आपणच पाहतो. तुम्हाला या कंपनीचे शेअर्स कमी दरात मिळवून देतो, त्यामुळे तुमचा दुप्पट फायदा होईल, असा विश्वास संपादित करून त्यांच्याकडून वेळोवेळी सुमारे ३० लाख ७४ हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने शेअर्स खरेदी केल्याचा ई-मेल कुंभोजकरांना पाठविला, परंतु त्यांच्या खात्यावर शेअर्स दिसत नव्हते. त्यामुळे त्यांनी विचारपूस केली असता त्याने सहा महिन्यांनी तुमच्या खात्यावर खरेदी केलेले शेअर्स दिसतील, असे सांगितले.
सहा महिने उलटूनही शेअर्स न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कुलकर्णी दाम्पत्याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दि. ११ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या दाम्पत्याकडून आणखी काहींची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. कुंभोजकर यांच्याकडून घेतलेल्या पैशांचे त्यांनी काय केले, याची माहिती पोलीस घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एम. गायकवाड करीत आहेत. (प्रतिनिधी)