कोल्हापूर : कोटीतीर्थ मार्केटसमोरील आयर्विन ख्रिश्चन हॉस्टेल कंपाउंडमधील जागेचा ताबा घेण्यावरून पाच घरांवर हल्ला केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी फरारी असलेल्या आणखी चौघाजणांना गुरुवारी अटक केली. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले जेसीबी मशीन व पाच हॉकी स्टिक, हल्ल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग फुटेज जप्त केल्या.
सुमारे ३० लाखांची सुपारी देऊन हा हल्ला केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. सूरज तानाजी नलवडे (२४, रा. शाहूनगर, राजारामपुरी), रोहन सुरेश साळोखे (३०, रा. बागल चौक), अमोल रघुनाथ पाटील (३५, रा. यादवनगर), विनोदकुमार शामलाल जसवाल (३५, रा. उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. २६ एप्रिल रोजी सहाजणांना अटक केली आहे; त्यामुळे अटक केलेल्यांची संख्या आता १० वर पोहोचली आहे.
येथील महिलांना धक्काबुक्की करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये सहाजण जखमी झाले. जागेचा ताबा सोडण्याबाबत त्यांना धमक्या देण्यात आल्या; त्यामुळे परिसरात दहशत माजली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी राहुल जवान कवाळे, किशोर कृष्णा कलकुटगी, धनंजय महादेव गडद्यावर, सचिन एकनाथ दुर्वे, इम्रान हुसेन पठाण, पिंटू बाळासो सातपुते यांना अटक करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली.
सूरज नलवडेवर यापूर्वी पाच गुन्हेसूरज नलवडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नासह एकूण पाच गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजारामपुरीतही ताबा घेण्याचा प्रयत्नआठ दिवसांपूर्वी अटकेत असलेला राहुल जवान कवाळे याने यापूर्वी राजारामपुरी आठवी गल्ली येथे एका घराचे कंपाऊंड पाडून जमिनीचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी सांगितले.