जनता बझारसाठी ३० ठराव दाखल
By Admin | Updated: April 26, 2017 18:37 IST2017-04-26T18:37:32+5:302017-04-26T18:37:32+5:30
स्थगितीनंतर निवडणूक प्रक्रिया गतिमान

जनता बझारसाठी ३० ठराव दाखल
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २६ : रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅपरेटिव्ह कंझ्युमर्स स्टोअर्स (जनता बझार) च्या निवडणुकीसाठी संलग्न संस्थांकडून ३० ठराव दाखल झाले आहेत.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे संस्था प्रतिनिधींची नावे पाठविली आहेत. तिथे संस्था गटातील प्रारूप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उर्वरित निवडणूक प्रक्रिया थोड्याच दिवसांत सुरू होणार आहे.
जनता बझारच्या निवडणुकीवरील स्थगिती उठल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा शहर उपनिबंधक संभाजी निकम यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. सुरुवातीला त्यांनी संलग्न संस्थांकडून ठराव मागितले होते. ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत २५ एप्रिल होती. जनता बझारशी संलग्न ४२ संस्था आहेत, पण त्यापैकी ३० संस्थांनी आपल्या प्रतिनिधींच्या नावे ठराव दाखल केले आहेत.
या संस्था प्रतिनिधींची नावे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केले आहेत. तिथे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी निकम यांनी दिली.