करवीरमधील २९५ संस्थांचे धुमशान
By Admin | Updated: December 22, 2014 00:15 IST2014-12-22T00:11:52+5:302014-12-22T00:15:09+5:30
‘क ’ गटातील १२१ संस्था : ‘ड’ गटातील संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात

करवीरमधील २९५ संस्थांचे धुमशान
मच्छिंद्र मगदूम ल्ल सांगरूळ
करवीर तालुक्यातील तीन गटांतील २९५ विविध संस्थांच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, तर सर्वाधिक १२१ संस्था या ‘क’ वर्गातील असून ‘क ’ व ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने येत्या महिनाभरात घेतल्या जाणार आहेत. याशिवाय सुमारे १५० दूध संस्थांचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला आहे.
सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून यंदा सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. ‘अ’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेतल्या जाणार आहेत. ‘ब’ वर्गातील संस्थांच्या निवडणुका जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून होणार असून, ‘क ’ व ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणुका तालुका निबंधकांच्या अधिकाराखाली घेतल्या जाणार आहेत. करवीर तालुक्यात एकूण ७३७ सहकारी संस्था कार्यरत असून, आॅक्टोबर २०१४ अखेर २९५ संस्था निवडणुकीस पात्र आहेत. त्यानंतर मुदत संपलेल्या संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणार आहेत. ‘अ’ वर्गात करवीर तालुक्यातील दोन साखर कारखाने, दूध संघ येत असल्याने त्यांच्या निवडणुका जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेतल्या जाणार आहेत. ‘ड’ वर्गातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, ‘क’ वर्गातील २० निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आॅर्डर काढल्या आहेत.
ग्रामीण भागात सहकारी संस्थेवर चेअरमन, संचालक असणे हे राजकीयदृष्ट्या सोयीचे असते. त्यामुळे या संस्थांवरील सत्तेसाठी कार्यकर्ते धडपडत असतात. त्यामुळे ज्याला निवडणूक लढवायची आहे, असे अनेक इच्छुक आता आपली कर्जे, थकबाकी भरत आहेत. तसेच कर्ज पूर्ण फेर केल्याचा दाखला घेत आहेत. मात्र, यावेळी विधानसभा निवडणूक निकालाचा परिणाम आता स्थानिक राजकारणावर होणार आहे. विधानसभा निवडणुकीत कोणी कोणाचा प्रचार केला यावर उमेदवार निश्चित होणार आहेत. त्यामुळे त्यादृष्टीनेही नेतेमंडळी आता सावध भूमिका घेत आहेत.