कोल्हापूर : रस्त्यावर भीक मागण्यासाठी पालकांकडूनच लहान मुलांचा वापर केला जात असल्याचे गुरुवारी समोर आले आहे. चाइल्ड हेल्पलाइन, जिल्हा बालसंरक्षण कक्ष, पोलिस मुख्यालय आणि अवनी संस्थेच्या पुढाकाराने शहरात एकाच दिवशी गुरुवारी ११ ठिकाणी छापे टाकून २९ बालकांचा वापर करुन भीक मागणाऱ्या २० जणांना पकडण्यात आले. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेले हे सर्वजण एकाच जिल्ह्यातील आहेत.महिला आणि बाल कल्याण विभागामार्फत भिकारीमुक्त शहर मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. टोलेजंग इमारती, मॉल, आयटी कंपन्या, शैक्षणिक संस्थांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी अलीकडे रस्त्यावर, चौका-चौकांत भीक मागणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसतो.
वाचा - मेडिकल चालकाकडून नशेच्या इंजेक्शनची विक्री, कोल्हापुरात दोघांना अटक याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर महिला बालकल्याण विभागाने शहरातील शहरातील कावळा नाका, लिशा हॉटेल सिग्नल परिसर, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, दाभोळकर सिग्नल, कोल्हापूर रेल्वे स्टेशन, व्हिनस कॉर्नरमार्गे सीपीआर चौक, शाहू खासबाग खाऊगल्ली, भवानी मंडप, महालक्ष्मी मंदिर आणि महाद्वार रोड अशा एकूण ११ ठिकाणी छापे टाकले. या ठिकाणावरून एकूण २९ बालकांसह (२० मुली व ०९ मुले) २० पालक (१९ महिला व एक पुरुष) एकूण ४९ जणांना पकडले.पोलिसांच्या मदतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या पालकांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना पोलिस संरक्षणात गुरुवारी बाल कल्याण समितीसमोर सादर केले असता संबंधितांना बालभिक्षेकरी कायद्याविषयक मार्गदर्शन करून बालकांना शासकीय योजनांची माहिती दिली. रस्त्यावरील बालकांच्या पालकांना बालभिक्षेकरी प्रतिबंध कायदाविषयी समजावून सांगितले आणि भीक मागण्यासाठी बालकांचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी बंधपत्राची पूर्तता करून बालकांना पालकांच्या ताब्यात दिले आणि समज देऊन सोडून देण्यात आले.
भिक्षा प्रतिबंध कायद्यानुसार चौकात, रस्त्यावर वस्तूंची विक्री करणे तसेच दूधपित्या बालकांचा वापर करणे हा गुन्हाच आहे. कोल्हापूर भिकारीमुक्त करण्यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. -सुहास वाईंगडे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी
Web Summary : Kolhapur authorities rescued 29 child beggars and detained 20 parents in coordinated raids across 11 locations. The operation, aimed at making Kolhapur beggar-free, revealed children were exploited for begging. Parents received counseling and warnings under child begging laws; children were released after assurances.
Web Summary : कोल्हापुर में 11 स्थानों पर छापे, 29 बाल भिखारी और 20 माता-पिता हिरासत में। बच्चों से भीख मंगवाने का खुलासा। माता-पिता को बाल भिक्षावृत्ति कानूनों के तहत चेतावनी, बच्चों को आश्वासन के बाद रिहा किया गया। शहर को भिखारी-मुक्त बनाने का अभियान।