दलित वस्तीमधील २७३ कामे अपूर्णच

By Admin | Updated: July 4, 2015 00:02 IST2015-07-03T23:51:41+5:302015-07-04T00:02:11+5:30

रक्कम वसूल करा : बैठकीत निर्णय

273 works in the Dalit settlement are incomplete | दलित वस्तीमधील २७३ कामे अपूर्णच

दलित वस्तीमधील २७३ कामे अपूर्णच

सांगली : जिल्ह्यात दलित वस्ती योजनेतील गटारी, रस्ते, समाजमंदिर आदींची २७३ कामे अपूर्ण आहेत. वारंवार सूचना देऊनही ठेकेदार कामे पूर्ण करणार नसतील, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून व्याजासह रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, असा निर्णय जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. वसंत आणि अपंग घरकुलांची कामेही अपूर्ण असून त्यांच्यावरही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अपंग आणि वसंत घरकुलांच्या तीनशे प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली.
सभापती उज्ज्वला लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली समाजकल्याण समितीची बैठक झाली. यावेळी सदस्यांनी दलित वस्ती सुधार योजनेतील २०११ ते २०१४ पासूनची २७३ कामे अपूर्ण आहेत. ठेकेदारांनी निधी घेऊनही कामे पूर्ण केली नाहीत. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना नोटिसा बजावून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. यावेळी लांडगे यांनी संबंधित ठेकेदारांना अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी महिन्याची मुदत दिली आहे. ३० जुलै २०१५ पर्यंत ठेकेदारांनी कामे पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कारवाई करून व्याजासह रक्कम वसूल करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी दलित वस्ती योजनेतील अपूर्ण कामे पूर्ण करून त्याचा अहवाल तातडीने देण्याची सूचना दिली आहे.
जिल्ह्यातील १५० अपंग आणि अन्य १५० लाभार्थींना वसंत घरकुल योजनेतून लाभ देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थींनी तातडीने प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही लांडगे यांनी दिली. (प्रतिनिधी)

पंधरा कोटींचा निधी
दलित वस्ती योजनेसाठी १५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीपैकी २०१४-१५ वर्षातील कामांसाठी सात कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. उर्वरित आठ कोटींच्या निधीतून दलित वस्त्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक, गटार, डांबरीकरण, समाजमंदिर आदीवर खर्च करण्यात येणार आहे. प्रस्ताव पाठवून देण्याचे आवाहन सभापती लांडगे यांनी केले आहे.

Web Title: 273 works in the Dalit settlement are incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.