२६ गावांना दीड महिन्यात खर्चावे लागणार साडेअकरा कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST2021-02-16T04:24:19+5:302021-02-16T04:24:19+5:30
दत्ता बिडकर, लोकमत न्यूज नेटवर्क हातकणंगले : गेल्या एप्रिल महिन्यापासून १५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाची अंमलबजावणी सुरू झाली ...

२६ गावांना दीड महिन्यात खर्चावे लागणार साडेअकरा कोटी
दत्ता बिडकर,
लोकमत न्यूज नेटवर्क
हातकणंगले : गेल्या एप्रिल महिन्यापासून १५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाची अंमलबजावणी सुरू झाली असताना १४ व्या वित्त आयोगाचा ७० % पेक्षा कमी खर्च केलेल्या २६ ग्रामपंचायतींचा ११ कोटी ५२ लाखांचा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. १४ व्या अयोगाच्या निधी खर्चाबद्दल पंचायत समिती प्रशासनाचे ग्रामपंचायतीवर निर्बंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र शासनाने गावची लोकसंख्या, क्षेत्रफळाचा विचार करून १४ व्या वित्त आयोगाचा प्रति व्यक्ती ३७५ रुपयांप्रमाणे ग्रामपंचायतींना थेट विकास कामासाठी निधी दिला. यामुळे ग्रामपंचायतींना प्रति वर्षी लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला. ग्रामपंचायतींनी मिळालेल्या निधीमधील १० % निधी प्रशासकीय खर्चासाठी तर उर्वरित ९० % निधी विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी गावकृती आराखडा ग्रामसभेमध्ये मंजूर करण्याची अट घातली होती. तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींना २०१५ पासून २०१९ पर्यंत ५५७ कोटी ८२ लाखांचा निधी चार वर्षांत मिळाला. यापैकी ५३३ कोटी १२ लाखांचा निधी जानेवारी २१ अखेर खर्च झाला असून अद्याप ११ कोटी ५२ लाखांचा निधी खर्चाअभावी शिल्लक आहे. शिल्लक ११ कोटी ५२ लाखांच्या खर्चासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत डेडलाइन दिली असून ७० % पेक्षा कमी खर्च केलेल्या २६ ग्रामपंचायतींचा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे ग्रामपंचायतींकडून निधी खर्चासाठी घाईगडबड सुरू आहे.
कोट:- १४ वा वित्त आयोगाचा निधी कोविड-१९ च्या कालावधीमध्ये खर्च झाला नाही. सहा महिने सर्वच विकास कामे ठप्प होती. निधी खर्चाला ३१ मार्च २१ ची मुदत आहे. दोन महिन्यांत निधी खर्च होणार नाही, मुदतवाढ मिळाली तरच निधी खर्च होईल अन्यथा शिल्लक निधी शासनाकडे परत करण्याशिवाय पर्याय नाही.
-संतोष पवार, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत.
O १४ व्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायतीला पाच वर्षांत ४८ लाख ७७ हजारांचा निधी मिळाला. त्यापैकी १३ लाख ५६ हजार खर्च केला. मिळालेल्या निधीपैकी फक्क २७ % निधी खर्च करून या ग्रामपंचायतीने तालुक्यामध्ये सर्वांत सुमार कामगिरी करून कमी खर्च करणारी ग्रामपंचायत म्हणून नामुष्की ओढावून घेतली आहे.
५० ते ६० टक्के निधी खर्च करणाऱ्या ग्रामपंचायती हालोंडी, माणगाववाडी, रुई, यळगुड.
O ६० ते ७० टक्क्यांपर्यंत खर्च करणाऱ्या ग्रामपंचायतींची नवे पारगाव, निलेवाडी, तळसंदे, संभापूर, इंगळी, कबनूर, कुंभोज, जंगमवाडी, रांगोळी, साजणी, तळदंगे, अंबपवाडी, चोकाक, चावरे, कापूरवाडी, टोप, वाठार तर्फ उदगाव, कोरोची, माले, मुडशिंगी, रेंदाळ.
८० ते ९० टक्के निधी खर्च करणारी गावे भादोले, किणी, मिणचे, नरंदे, नागाव, जुनेपारगाव, सावर्डे, कासारवाडी, मौजे वडगाव, आळते, चंदूर, हिंगणगाव, मजले, रुकडी, तारदाळ, खोतवाडी आणि दुर्गेवाडी.
९० ते १०० टक्के निधी खर्च करणारी गावे तासगाव, पट्टणकोडोली, अंबप, भेंडवडे, घुणकी, हेरले, लाटवडे, मनपाडळे, खोची, पाडळी, शिरोली, वाठार तर्फ वडगाव, लक्ष्मीवाडी, बिरदेववाडी, नेज, माणगाव, तिळवणी.