राज्य संवर्ग यादीतून २६ जणांना डच्चू
By Admin | Updated: May 21, 2015 00:09 IST2015-05-20T21:51:23+5:302015-05-21T00:09:08+5:30
इचलकरंजी नगरपरिषद : उच्च न्यायालयाचा आदेश

राज्य संवर्ग यादीतून २६ जणांना डच्चू
इचलकरंजी : शासनाच्या राज्यस्तरीय संवर्गात समावेश झालेल्या येथील नगरपरिषदेच्या २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द झाला. याबाबत नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने उपरोक्त आदेश दिला.सन २००८ मध्ये शासनाच्या राज्यस्तरीय संवर्ग यादीमध्ये इचलकरंजी नगरपरिषदेकडील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश झाला होता. त्याप्रमाणे काही अधिकाऱ्यांची बदली अन्य नगरपालिकांमध्ये सुद्धा झाली आहे, तर संवर्गाच्या यादीमधील काही कर्मचारी बदलीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे येथील नगरपालिकेकडील प्रशासन मोठ्या प्रमाणात कोलमडून पडण्याची भीती होती. अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. म्हणून शासनाच्या संवर्ग यादीच्या विरोधात नगरसेवक चोपडे यांनी न्यायाधीश रमेश पाटील व न्यायाधीश ए. एस. गडकरी यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन नगरपालिकेकडील २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना या यादीतून वगळण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे आता अन्य नगरपालिकांमध्ये बदली झालेले कर्मचारी पुन्हा इचलकरंजीत परतण्याची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)