नायब तहसीलदारची २५ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:34+5:302021-03-26T04:22:34+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरातील महसूल विभागात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, कारकून, लिपिक, तलाठी, वाहनचालक, शिपाई अशा वेगवेगळ्या प्रकारची १६८ पदे ...

नायब तहसीलदारची २५ पदे रिक्त
कोल्हापूर : कोल्हापुरातील महसूल विभागात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, कारकून, लिपिक, तलाठी, वाहनचालक, शिपाई अशा वेगवेगळ्या प्रकारची १६८ पदे रिक्त आहेत. मंत्रिमंडळाच्या पदभरतीच्या निर्णयामुळे सध्या या कामांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेल्या कर्मचाऱ्यांचा भार हलका होणार आहे. दरम्यान, अध्यादेश आल्यानंतरच याबाबतची कार्यवाही होईल.
शासनाने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसुली विभागांत अधिकाऱ्यांची रिक्त पदे समप्रमाणात भरण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बारा तालुके, सहा प्रांत कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालय कार्यासन अशी एकूण १ हजार ३०८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या १ हजार १४० पदे कार्यरत असून, १६८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे अन्य कर्मचाऱ्यांवर कामाची अधिक जबाबदारी पडली आहे. नायब तहसीलदार हे जबाबदारीचे पद असून, रिक्त जागांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रोज क्षमतेपेक्षा जास्त काम करावे लागत आहे. जिथून प्रस्ताव किंवा फाईलीची सुरुवात होते, त्या लिपिक-टंकलेखकांची ५१ पदे रिक्त आहेत. रोजची पत्रे तयार करणे, जीआर अपडेट ठेवणे, प्रस्ताव बनवणे या बाबी करताना अतिरिक्त कार्यभार असल्याने प्रस्तावात चुका राहण्याची शक्यता असते. याशिवाय निवडणुका, जनगणना, कोरोनाचा कठीण कालावधी या परिस्थितीत कर्मचाऱ्यांची दहा तासाहून अधिक काळ ड्युटी होते. त्यामुळे सर्व रिक्त पदे तातडीने भरली जाणे गरजेचे आहे.
--
पदाचे नाव : मंजूर पदे : कार्यरत पदे : रिक्त पदे
उपजिल्हाधिकारी : १४ : ११ : ३
तहसीलदार : २२ : २१ : १
नायब तहसीलदार : ५८ : ३३ : २५
अव्वल कारकून : १८६ : १७३ : १३
मंडल अधिकारी : ७६ : ७४ : २
लिपिक-टंकलेखक : २८८ : २३७ : ५१
तलाठी : ४६३ : ४४८ : १५
वाहनचालक : २५ : १९ : ६
शिपाई : १७४ : १२२ : ५२
एकूण : १ हजार ३०८ : १ हजार १४० : १६८
------------