कणबरकर कुटुंबीयांची विद्यापीठाला २५ लाख देणगी
By Admin | Updated: September 4, 2015 23:10 IST2015-09-04T23:10:24+5:302015-09-04T23:10:24+5:30
शिक्षकाची अनोखी कृतज्ञता : उत्कृष्ट कामाबद्दल करणार गौरव

कणबरकर कुटुंबीयांची विद्यापीठाला २५ लाख देणगी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजी विद्यापीठाला २५ लाख रुपयांच्या ठेवीसाठी शुक्रवारी धनादेश प्रदान केला. कणबरकर यांच्या पत्नी शालिनी यांनी या ठेवीसाठीचा धनादेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. देशातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांत अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला प्राचार्य कणबरकर यांच्या १३ एप्रिल या स्मृतिदिनी या रक्कमेतून दरवर्षी पुरस्कार देण्यात येईल. एक लाख ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असेल. एका हाडाच्या शिक्षकाच्या कुटुंबियांनी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजाप्रती वेगळी कृतज्ञता जपली.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी गुरुवारी (दि. ३) प्राचार्य कणबरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. कणबरकर सरांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली. प्राचार्य कणबरकर यांचे चिरंजीव डॉ. अरुण यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, ‘बीसीयूडी’चे संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे, इचलकरंजीच्या व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत, प्राचार्य कणबरकर यांच्या कन्या डॉ. अंजली साबळे, मेघा वागळे,
डॉ. नमिता खोत उपस्थित होत्या. शिवाजी विद्यापीठाच्या या माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्कार’ या निधीतून देण्यात येईल. त्यासाठी विद्यापीठाशी केलेल्या सामंजस्य कराराला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. पुरस्कारार्र्थीच्या निवडीसाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली पाचसदस्यीय विशेष शोध समिती
स्थापन करण्यात येणार आहे. कुलसचिव या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव असतील. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत हे सदस्य असतील. (प्रतिनिधी)
शिवाजी विद्यापीठासह ज्या-ज्या शैक्षणिक संस्थांनी आपले आयुष्य घडविण्यात मोलाचे योगदान दिले, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची कणबरकर सरांची इच्छा होती. तिच्या पूर्ततेचे पहिले पाऊल म्हणून पुरस्कार देण्याचा निर्णय आम्ही निर्णय घेतला. त्यानुसार विद्यापीठाला २५ लाखांचा निधी सुपूर्द केला आहे. या पुरस्कारातून सरांचे नाव राहील. शिवाय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहनदेखील मिळेल.
- श्रीमती शालिनी कणबरकर, पत्नी
राज्यात प्रथमच
शिक्षक म्हणजे नुसते घेणारा अशी प्रतिमा समाजात ठळक होत असताना एखाद्या माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांकडून एवढा मोठा निधी विद्यापीठास देण्याची हा राज्यातील पहिलाच प्रसंग असावा. या माध्यमातून कणबरकर सरांच्या स्मृती चिरंतन दरवळत राहतील, अशा भावना कुलगुरू
डॉ. शिंदे यांनी व्यक्त केल्या.