घालवाडला २५ पासून २६ वे द. महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन
By Admin | Updated: December 19, 2014 00:27 IST2014-12-18T21:58:31+5:302014-12-19T00:27:54+5:30
शिरोळ तालुक्यात प्रथमच--कृषी, आरोग्य, शैक्षणिक, साहित्य व कला अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन

घालवाडला २५ पासून २६ वे द. महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन
शिरोळ : शिरोळ तालुक्यात प्रथमच घालवाड येथे २६ वे दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनांतर्गत कृषी, आरोग्य, शैक्षणिक, साहित्य व कला अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार (दि. २५)पासून कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. आदर्श कला, क्रीडा मंडळाच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, गुरुवारी (दि. २५) पशु, पक्षी व कृषी प्रदर्शन, मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर, तर शुक्रवारी (दि. २६) राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, रात्री आठ वाजता ‘भूपाळी ते भैरवी’चे सादरीकरण होणार आहे. शनिवारी (दि. २७) सकाळी साडेसात वाजता ग्रंथदिंडीचे पूजन होणार असून, या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांना मान मिळाला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, गुरुमोल इन्स्टिट्युटचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद रिसबूड यांना स्वागताध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे. दुपारी तीन वाजता कवी संमेलन होणार आहे. सायंकाळी सहा वाजता यशस्वी उद्योजकांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली असून, रात्री आठ वाजता ‘छुमंतर’ ही विनोदी नाटिका सादर केली जाणार आहे. रविवारी (दि. २८) ‘शेती, शेतकरी, राजकारण आणि साहित्य’, या विषयावर परिसंवाद होणार असून, त्यानंतर कथाकथनाचा कार्यक्रमही होणार आहे. दुपारी तीन वाजता सीआयडी पुणे विभागाचे जिल्हाप्रमुख पी. आर. पाटील, आमदार उल्हास पाटील, गुरुदत्तचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ होणार आहे. घालवाड येथील स्व. डॉ. पी. बी. पाटील साहित्यनगरी, पाणीपुरवठा क्रीडांगणावर होणाऱ्या या संमेलनासाठी सात हजार स्क्वेअरफूट जागा आरक्षित करण्यात आली आहे, अशी माहिती आदर्श मंडळाचे अध्यक्ष स्वरूपसिंह शितोळे यांनी दिली. (प्रतिनिधी)