जयसिंगपूरकरांना २४ तास पाणी
By Admin | Updated: November 24, 2014 23:05 IST2014-11-24T22:43:22+5:302014-11-24T23:05:57+5:30
योजनेसाठी हायटेक यंत्रणा : साडेआठ कोटींचा प्रस्ताव; नगरपालिका करणार नियोजन

जयसिंगपूरकरांना २४ तास पाणी
संदीप बावचे - जयसिंगपूर -शहरात पाणीपुरवठ्याची हायटेक यंत्रणा करण्यासाठी जयसिंगपूर नगरपालिकेने विकासात्मक पाऊल टाकले आहे. वॉटर आॅडिट योजनेनंतर नळ पाणीपुरवठा, जॅकवेलचे विस्तारीकरण, जलशुद्धिकरणाचे नूतनीकरण, दहा लाख लिटर क्षमतेची नवीन टाकी व त्यासाठी आवश्यक वितरण नलिका अशी साडेआठ कोटी रुपयांची योजना शहरात राबविली जाणार आहे.
सन १९६७ मध्ये उदगाव येथील कृष्णा नदीवरून जयसिंगपूर शहरासाठी नळ पाणी योजना राबविताना २५ हजार लोकसंख्या गृहित धरून ती करण्यात आली होती. त्या काळात चिपरी गावालाही पाणीपुरवठा केला जात होता. टप्प्याटप्प्याने वाढलेली उपनगरे, लोकसंख्या, आदींमुळे पुरेसा पाणीपुरवठा करणे अडचणीचे ठरले होते. सन २००६ ते २०११ या काळात पाणी साठवणूक क्षमता कमी प्रमाणात होत असल्यामुळे पाणीपुरवठा करण्यामध्ये असमतोलपणा निर्माण झाल्याचा प्रश्न पुढे आला होता. यावेळी नगरसेवक व प्रशासन यंत्रणेने पुढाकार घेऊन केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएटी या योजनेतून दहा कोटी ऐंशी लाखांचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामध्ये अजिंक्यतारा सोसायटी येथे सात लाख, दिन बंधू येथे पाच लाख लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या. यामुळे शहरातील राजीव गांधीनगर, दत्त कॉलनी, प्रियदर्शनी कॉलनी, हेरवाडे कॉलनी, खामकर मळा या भागाला पाणीपुरवठा करणे शक्य झाले. दरम्यान, शासनाच्या अन्य निधीतून व पालिकेच्या फंडातून शाहूनगरमध्ये सात लाख, आंबेडकर सोसायटीत दोन लाख, आठवी गल्लीत दोन लाख, नोकर हौसिंग सोसायटी येथे तीन लाख क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या. विस्तारित शहरामुळे या पाण्याच्या टाक्या आवश्यक होत्या.
शहराला मीटर पद्धतीने पाणी पुरवठ्यास प्रारंभ झाल्यानंतर जल व ऊर्जा लेखा परीक्षण (वॉटर आॅडिट) ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ग्राहक सर्वेक्षण, जल लेखा परीक्षण, ऊर्जा लेखा परीक्षण, पाणी मोजमाप यंत्र, भविष्यातील नियोजित आराखडा, जी.आय.एस. (वेबसाईट) प्रणाली आणि मीटर रीडिंग यंत्रणा यावर हा निधी खर्च करण्यात आला आहे. यामुळे पाणी उपसा होणाऱ्या ठिकाणापासून ते वितरण प्रणालीपर्यंत पाण्याची मोजदाद करणे सोईस्कर बनले आहे.
वॉटर आॅडिट योजना राबविण्यात आल्यानंतर या योजनेवर काम करणाऱ्या जीवन प्राधिकरण व खासगी एजन्सीने दिलेल्या अहवालानुसार सध्याच्या पाणीपुरवठा योजना कमकुवत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे अद्ययावत अशी पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या शिफारशीनुसार शासनाचा पाणीपुरवठा विभाग व नगरपालिकेने पाणी योजना हायटेक बनविण्याच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेण्याचे धोरण निश्चित केले आहे. सध्या असलेल्या जॅकवेलचे विस्तारीकरण करण्याबरोबरच जलशुद्धिकरण केंद्राचे नूतनीकरण, जुनी खराब झालेली दगडी टाकी, ई-वार्ड टाकीच्या जागी दहा लाख लिटर्स क्षमतेची नवीन पाण्याची टाकी बांधणे, त्यासाठी आवश्यक वितरण नलिका, असा साडेआठ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा ठराव नुकताच विशेष सभेत मंजूर केला आहे.
२४ तास पाणी
नळ पाणीपुरवठ्याच्या नव्याने प्रस्तावित असणाऱ्या या योजनेतून येत्या २५ वर्षांत शहरातील पाणीपुरवठा अद्ययावत करण्यात येणार असून, सुमारे एक लाख नागरिकांना पाणीपुरवठा होईल, असा आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरात शंभर टक्के नळांना मीटर व पाण्याचा स्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास नळाला २४ तास पाणी देण्याची योजना नगरपालिकेकडून भविष्यात सुरू करण्यात येईल, असा आशावाद माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अस्लम फरास यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
योग्य नियोजन
याव्यतिरिक्त शहराच्या शाहूनगर, आंबेडकर सोसायटी, लक्ष्मी पार्क यांसह उर्वरित भागांत तांत्रिकदृष्ट्या योग्य व अचूक पाण्याच्या पाईपलाईनही टाकण्यात येणार आहेत.