सहा महिन्यांत २३ खून
By Admin | Updated: July 13, 2015 00:06 IST2015-07-13T00:01:10+5:302015-07-13T00:06:58+5:30
जिल्ह्यातील चित्र : महिन्याला सरासरी चार खुनांची होते नोंद

सहा महिन्यांत २३ खून
एकनाथ पाटील- कोल्हापूर -राजकीय, सामाजिक, जमीन, मालमत्ता, आर्थिक व्यवहारांसह कौटुंबिक वाद, अनैतिक संबंध, आदी कारणांतून गेल्या सहा महिन्यांत २३ खून पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. महिन्यात सरासरी चार खुनांची नोंद गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आतापर्यंत २१ खुनांचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असले तरी ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यासह आणखी एक खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस रात्रीचा दिवस करीत आहेत.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची दर महिन्याला गुन्हेविषयक बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक घेत असतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच ‘खडे बोल’ सुनावले जातात; परंतु त्याचा परिणाम प्रत्यक्ष कामावर होताना दिसत नाही. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या घटनेने तसेच आरोपी अद्यापही न सापडल्याने कोल्हापूर पोलिसांचा चेहरा काळवंडला आहे. त्यातच चेन स्नॅचिंगमध्ये तरुणींचाही सहभाग स्पष्ट झाल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे.
दोन खुनांचे गूढ कायम
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येबरोबरच करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथील पाझर तलावात, खून करून पोत्यात बांधून टाकलेल्या ३५ वर्षांच्या तरुणाच्या खुनाचे गूढ अद्यापही कायम आहे. या दोन्ही खुनांचे कोणतेही धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
खुनाची शाश्वती नाही
खून करण्याआधीच खून कोणाचा, कधी, कुणामार्फत याची व्यवस्था करण्याबरोबरच काही पोलिसांशी गोपनीय पद्धतीने अर्थपूर्ण वाटाघाटी (सेटलमेंट) करण्याचे धैर्य गुन्हेगारांमध्ये आहे. वर्चस्ववादात आड येईल त्याला संपविण्याचे सूत्रच गुन्हेगारांनी अवलंबिले आहे. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्कता घेत आहेत.
गुन्हेगारी रोखण्यासाठी आम्ही सर्व स्तरांवर प्रयत्न करीत आहोत. सराईत गुन्हेगारी टोळ्यांना ‘मोक्का,’ तर गुंडांना हद्दपार करण्याची कार्यवाही सुरू आहे. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यासह अन्य दोन खुनांचे गुन्हे लवकरच उघडकीस येतील, असा आम्हाला विश्वास आहे.
- एस. चैतन्या,
अप्पर पोलीस अधीक्षक