कोल्हापूर : जिल्ह्यात २३ साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असला तरी केवळ चारच कारखान्यांनी पहिली उचल जाहीर करून गाळप चालू ठेवले आहे. ‘जवाहर’, ‘पंचगंगा’, ‘दत्त’ व ‘गुरुदत्त’ या कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली असून, यामध्ये ‘पंचगंगा’ कारखान्याची सर्वाधिक उचल प्रतिटन ३३०० रुपये आहे. शेजारील कारखान्यांची उचल आणि बँकांकडून मिळणारा पैसे याचा अंदाज घेऊनच इतरांचा निर्णय राहणार आहे.शासनाने हंगाम २०२४-२५ साठी १०.२५ टक्के बेसीक उताऱ्यास प्रतिटन ३४०० रुपये एफआरपी निश्चित केली आहे. जिल्ह्यातील १४ सहकारी व ९ खासगी साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा हंगाम उशिरा सुरू झाल्याने उसाची उचलीलाही उशीर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पहिल्या उचलीकडे लागल्या आहेत. ‘दत्त-शिरोळ’ व ‘गुरुदत्त-टाकळीवाडी’ या कारखान्यांनी उचल जाहीर करूनच तोडण्या सुरू केल्या. गेल्या दोन दिवसात ‘जवाहर-हुपरी’ व ‘पंचगंगा-रेणुका शुगर्स इचलकरंजी’ यांनी जाहीर केल्याने इतर कारखान्यांच्या उचलीकडे नजरा लागल्या आहेत. शेजारील कारखान्यांची किती उचल आहे, ते पाहूनच इतर कारखान्यांचे निर्णय होणार आहेत.
प्रतिवर्षी एकरकमी उचल जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखानदारीवर मोठा दबाव असे परंतु, यंदा संघटनेचे वेगवेगळे नेते परस्पर कारखानदारांनाच अगोदर भेटून किती उचल द्यावी याचे मार्गदर्शन करू लागली आहेत. त्यामुळे एकत्रित संघटनेचा जो दबाव होता तो पूर्ण निष्फळ ठरला असून, त्यामुळेच उचल न जाहीर करताच कारखान्यांची धुराडी पेटली आहेत.या कारखान्यांनी केली उचल जाहीर
- पंचगंगा (रेणुका शुगर्स) इचलकरंजी - ३३००
- गुरुदत्त, टाकळीवाडी - ३१५०
- जवाहर, हुपरी - ३१५०
- दत्त, शिरोळ - ३१४०
‘स्वाभिमानी’ची ३७०० रुपयांची मागणी
‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने यावर्षी प्रतिटन ३७०० रुपये दराची मागणी केली आहे. साखर आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर त्यांची सध्या मागणी रेटण्याचा प्रयत्न असून, आंदोलनाची धार किती राहणार यावरच, पहिल्या उचलीचे भवितव्य अवलंबून राहणार हे निश्चित आहे.हंगाम २०२४-२५ मधील कारखानानिहाय एफआरपी, प्रतिटन -
कारखाना - २०२३-२४ उतारा - तोडणी-ओढणी - देय एफआरपी
- आजरा - १२.४२ - ७८२ - ३३३८
- भोगावती - १२.३२ - ६११ - ३४७६
- राजाराम - ११.६० - ६६७ - ३३८१
- शाहू - १२.०८ - ७५९ - ३२४८
- दत्त - १२.१४ - ७२४ - ३३०३
- बिद्री - १२.५५ - ७९७ - ३३६६
- जवाहर - १२.१५ - ७४२ - ३२८८
- मंडलीक - ११.५५ - ७०५ - ३१२७
- कुंभी - १२.८३ - ६४८ - ३४०८
- पंचगंगा - १२.७० - ७०८ - ३५०५
- शरद - १२.०६ - ७४० - ३२६०
- वारणा - ११.२२ - ६७४ - ३०४८
- गायकवाड - ११.६१ - ७८३ - ३०६९
- डी. वाय. पाटील - १२.३८ - ७४२ - ३३६५
- दालमिया - १३.३५ - ८०३ - ३६२६
- गुरुदत्त - १२.४६ - ८०९ - ३३२५
- युको क्रेन - १२.७२ - ८२५ - ३३९५
- आलेम - १२.४६ - ७७९ - ३३५५
- संताजी घोरपडे - ११.७२ - ८६१ - ३०२७
- फराळे - १२.५१ - ९७९ - ३१७१
- इंदिरा तांबाळे - ११.७२ - ९३६ - २९५२
- गडहिंग्लज - १२.४१ - ६४५ - ३४७१