बहिरेवाडीत २२ शेळ्यांचा मृत्यू
By Admin | Updated: November 15, 2014 00:14 IST2014-11-15T00:09:48+5:302014-11-15T00:14:55+5:30
दोन लाखांचे नुकसान : पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप

बहिरेवाडीत २२ शेळ्यांचा मृत्यू
वारणानगर : बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील भगवान सखाराम सातपुते यांच्या शेळीपालन कळपातील २२ शेळ्यांचा शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे दोन लाखांवर नुकसान झाले असून, शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शेळ्यांच्या आजारपणाबाबत कोणतेही प्रयत्न होत नसल्याने इतर शेळ्यांच्या बाबतीत सातपुते कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत.
बहिरेवाडी येथे भगवान सातपुते गेल्या सात वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय करतात. १० आॅक्टोबरला या कळपातील एका शेळीचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही आणखी एका शेळीचा मृत्यू झाला. म्हणून मृत शेळीस कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. शेळीचे सॅम्पल तपासणीसाठी डॉक्टरांनी घेतले; परंतु सातपुते यांना सॅम्पल घेतलेच नाही. त्यामुळे रिपोर्ट देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. आजाराचे कोणतेही कारण न समजल्याने शेळ्यांचा आजारही वाढत गेला. दरम्यानच्या काळात आणखी ११ शेळ्यांचा मृत्यू झाला.
सातपुते यांनी ३० आॅक्टोबरला कोल्हापूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात फोन केला असता तेथील कर्मचाऱ्यांनी सातपुते यांना उडवाउडवीची उत्तरे देत तळसंदे
(ता. हातकणंगले) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मृत शेळीस दाखवून शवविच्छेदन करून घ्या, असे सांगण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सॅम्पल काढून घेऊन कोल्हापूरच्या प्रयोगशाळेत पाठविले. अखेर सातपुते यांना कोणताही रिपोर्ट दवाखान्याकडून मिळाला नाही. शेवटी महिन्यांत २२ शेळ्यांचा मृत्यू झाला. सातपुते यांना शेवटच्या क्षणापर्यंत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले. आजपर्यंत सातपुते यांच्या कुटुंबीयांचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. सध्या उरलेल्या शेळ्या बचावतील का? या चिंतेत हे कुटुंबीय आहे. दरम्यान, आज, शुक्रवारी सातपुते यांनी संबंधित शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराबाबत जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी चौकशी करून न्याय देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)
४तळसंदे (ता. हातकणंगले) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मृत शेळीचे विच्छेदन करून घ्या, असे सांगण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सॅम्पल काढून घेऊन कोल्हापूरच्या प्रयोगशाळेत पाठविले. याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही सातपुते यांना अद्याप कोणताही अहवाल पशुवैद्यकीय दवाखान्याकडून मिळालेला नाही.