‘महाद्वार’ला २२ फुटी तोरण
By Admin | Updated: July 22, 2015 00:39 IST2015-07-22T00:39:36+5:302015-07-22T00:39:36+5:30
आजपासून धार्मिक विधी : उद्यापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया

‘महाद्वार’ला २२ फुटी तोरण
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्या प्रारंभानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या वतीने महाद्वार कमानीला २२ फुटी तोरण बांधण्यात आले. आज, बुधवारपासून महापूजेने मूर्तीवरील धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे.
अंबाबाई मूर्तीवर उद्या, गुरुवारपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. पुरातत्त्व खात्याचे अधिकारी तब्बल सोळा दिवस मूर्ती संवर्धनाचे काम करणार आहेत. याच कालावधीत हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या वतीने त्या अनुषंगाने महत्त्वाचे धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात करताना त्याचे प्रतीक म्हणून तोरण बांधण्याची पद्धत आहे. रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्या प्रारंभाचा भाग म्हणून मंगळवारी संध्याकाळी महाद्वार कमानीला तोरण बांधण्यात आले. यावेळी श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनीश्वर, आशुतोष ठाणेकर, केदार मुनीश्वर उपस्थित होते. सुबोध बापट यांनी नियोजन केले.
इतरवेळी बनविले जाणारे तोरण हे कागदाचे असते. मात्र, महाद्वार कमानीला बांधण्यात आलेले २१ फुटी तोरण प्लायवूडपासून बनविण्यात आले आहे. त्याच्या मध्यभागी गणपतीची प्रतिकृती आहे. तोरणाला ११ नारळ आणि १७ पाने लावण्यात आली आहेत. रमेश माळकर यांनी अवघ्या दोन दिवसांत हे तोरण तयार केले आहे. अंबाबाईच्या कार्यासाठी आम्हाला तोरण बनविण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया माळकर यांनी दिली.
सकाळी साडेदहा वाजता धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे. आज आणि उद्या (गुरुवार) दोन दिवस अंबाबाई मूर्तीमधील प्राणतत्त्व कलशात घेण्याचा विधी होईल. गुरुवारी मूर्ती पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द होईल.