२१०० जात प्रमाणपत्रांचे वाटप
By Admin | Updated: June 4, 2015 00:45 IST2015-06-04T00:24:44+5:302015-06-04T00:45:31+5:30
विशेष मोहीम : समितीकडून पाच हजार दाखल्यांची छाननी

२१०० जात प्रमाणपत्रांचे वाटप
कोल्हापूर : विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने विशेष वाटप अभियानांतर्गत पडताळणी केलेल्या निर्वेध ५००० जात प्रमाणपत्रांपैकी २१०० प्रमाणपत्रांचे सोमवारी वाटप केले. उर्वरित प्रमाणपत्रांचे वाटप विचारे माळ येथील कार्यालयात होत आहे.
समितीने गेल्या महिन्याभरात १ जूनला विशेष अभियानांतर्गत जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी गेल्या महिन्याभरात शैक्षणिक सेवा याकरिता आलेल्या अर्जांपैकी तब्बल ५००० जात प्रमाणपत्रांची पडताळणी समितीने छाननी करीत तयार केली आहे. ही तयार प्रमाणित केलेली प्रमाणपत्रे घेण्यासाठी समितीने अर्जदारांना एसएमएस पाठविले होते. त्यापैकी सोमवारी २१०० प्रमाणपत्रांचे उमेदवारांना वाटप करण्यात आले. उर्वरित प्रमाणपत्रांचे वाटपही केले जात आहे. ही तयार प्रमाणपत्रे वाटप करण्यासाठी कार्यालयाने विशेष खिडक्यांसह यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यातूनही उरलेली प्रमाणपत्रे नियमित कार्यालयीन वेळेत उमेदवारांना घेऊन जाता येणार आहेत.
समितीने पडताळणी केलेली प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी अर्जदारांनी जातीचा दाखला, ओळखपत्रासह स्वत: हजर राहणे गरजेचे आहे. ज्या अर्जदारांना प्रमाणपत्र घेण्यासाठी स्वत: हजर राहणे शक्य नाही, अशांनी आपले आई-वडील, बहीण-भाऊ किंवा चुलत्यांना पाठवून द्यावे; पण त्यांच्यासोबत ‘बार्टी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले अर्जदाराचे संमतीपत्र, अर्जदाराच्या जातीच्या दाखल्याची झेरॉक्स, ओळखपत्राची झेरॉक्स, तसेच स्वत:चे ओळखपत्र द्यावे. त्याशिवाय दाखला दिला जाणार नाही. जातपडताळणी प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यावरील
जात प्रमाणपत्र क्रमांक, स्पेलिंग व अन्य तपशील अर्जदारांनी तपासून घेण्याचे आवाहनही समितीने केले आहे.
ज्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत, त्या उमेदवारांनी अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करावी व ज्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत, अशा सर्व उमेदवारांनी ही मोहीम संपल्यानंतरही कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र ताब्यात घेण्याचे आवाहन समितीचे सदस्य सचिव भालचंद्र मुळे व वृषाली शिंदे यांनी केले आहे.