कर्नाटकात उसाला प्रतिटन २०० रुपये
By Admin | Updated: July 2, 2015 00:23 IST2015-07-01T23:38:49+5:302015-07-02T00:23:43+5:30
राज्याला ९०० कोटी रूपयांचे कर्ज मिळेल, पण यापूर्वी राज्यातील साखर कारखानदारांनी कर्ज घेतले असल्या कारणाने ते परत कर्ज घेण्याच्या तयारीत नाहीत.

कर्नाटकात उसाला प्रतिटन २०० रुपये
बेळगाव : वर्ष २०१३-१४ या आर्थिक वर्षातील ऊस उत्पादकांची थकीत बिले अदा करण्यासाठी कर्नाटक सरकारने प्रतिटन उसाला २०० रूपये देण्याची घोषणा मंगळवारी (दि.३० जून) विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केली. या रकमेतील १०० रुपये १० जुलैपूर्वी व उर्वरित १०० रुपये ३१ जुलैपूर्वी दिले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या व सहकारमंत्री महादेव प्रसाद यांनी केली.विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत थकीत ऊस बिलाप्रश्नी घमासान चर्चा झाली. विरोधी पक्षांनी १० जुलैपूर्वीच सर्व थकीत बिले अदा करण्याची आग्रही मागणी धरत सभात्याग केला. याच प्रश्नावर सायंकाळी मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवेदन दिले. ते म्हणाले, २०१३-१४च्या ९२३ कोटींच्या थकबाकीसाठी उसाला प्रतिटन २०० रुपये चालू महिन्यातच दिले जाईल.
२०१४-१५ साठी एफआरपीनुसार दर घोषित करण्यात आला असून, ८० टक्के बिल अदा करण्यात आली आहेत. उर्वरित २० टक्के बिलाची रक्कम ही दोन हजार १२० कोटी असून, या बिलासंबंधी अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली आहे. राज्याला ९०० कोटी रूपयांचे कर्ज मिळेल, पण यापूर्वी राज्यातील साखर कारखानदारांनी कर्ज घेतले असल्या कारणाने ते परत कर्ज घेण्याच्या तयारीत नाहीत. या बिलाबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. (प्रतिनिधी)