२००भाडेकरू व्यापाऱ्यांना नोटिसा
By Admin | Updated: January 20, 2015 00:04 IST2015-01-19T21:52:59+5:302015-01-20T00:04:49+5:30
वडगाव मुख्याधिकाऱ्यांची कार्यवाही : पालिकेच्या जागेत पक्की बांधकामे, तारण कर्ज काढल्याची तक्रार

२००भाडेकरू व्यापाऱ्यांना नोटिसा
सुहास जाधव - पेठवडगाव- शहरातील शासनाच्या व पालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा भाडेतत्त्वावर व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. पालिकेला उत्पन्न मिळावे या उद्देशाने या जागा देण्यात आल्या, पण या जागांवर भाडेकरूंनी कच्ची-पक्की बांधकामे केली आहेत. तसेच या जागा तारण देऊन त्यावर मोठ्या रकमेची कर्ज काढलेली आहेत, अशी तक्रार झाली आहे. या तक्रारीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार सुमारे २०० हून अधिक भाडेधारकांना सात दिवसांत खुलासा देण्याच्या नोटिसा मुख्याधिकारी यांनी बजावल्या आहेत.
वडगाव शहराची पालिकेच्या स्थापनेपासूनच म्हणजे १८८७ पासून व्यापारी पेठ अशी ओळख आहे. पंचक्रोशीतील सर्वांत मोठी व्यापार पेठ म्हणून याचा लौकिक आहे. त्यामुळे येथे अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायासाठी व्यापाऱ्यांचे प्राध्यान्य असते. परिणामी नगरपालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना पालिकेच्या व शासनाच्या (पालिका भोग वटदार असलेल्या) खुल्या जागा भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. येथे व्यापाऱ्यांनी सोयी व संरक्षणासाठी कच्ची-पक्की बांधकामे केल्याचे समजते.
नेमक्या वर्मावर बोट ठेवून माहिती अधिकाराची माहिती असलेल्या माजी उपनगराध्यक्षांनी विभागीय आयुक्तांकडे १४ जुलै २०१४ ला लोकशाही दिनात अर्ज केला. यामध्ये पालिकेच्या आरक्षित जागा, नाले, गटर्सवर बांधकामे झाली आहेत, तर वठार-हातकणंगले व टोप-आष्टा राज्यमार्गावर शासनाच्या ताब्यातील मिळकतीवर अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याचे म्हटले आहे. यामध्ये बीअर बार, देशी दारू दुकान, जुगार क्लब, आॅनलाईन जॅकपॉट लॉटरी, चिकन सेंटर असे व्यवसाय सुरू असल्याचा दावा अर्जात केलेला आहे. येथे अनधिकृत पक्की बांधकामे करून कर्जे घेतलेली आहेत. पालिकेच्या मालकी असलेल्या जागेवर संस्थेने विनापरवारना तिसरा मजला बांधल्याचे म्हटले आहे.
या सर्व प्रकरणी कारवाई करावी यासाठी लोकशाही दिनी मागणी केली. ही मागणी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे केली असून, त्यानुसार संबंधित अर्जदारांच्या तक्रार अर्जानुसार कार्यवाही करण्यात यावी, असे लेखी आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यानुसार वडगाव नगरपालिकेने संबंधित जागाविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. त्यानुसार संबंधित भाडेधारकांनी सात दिवसांत लेखी म्हणणे पालिकेत दाखल करावे, अन्यथा उपलब्ध कागदपत्रावरून योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशा नोटीसा आजपर्यंत २०० भाडेधारकांना लागू केल्या आहेत, ही प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे व्यापाऱ्यात खळबळ उडाली आहे.(पूर्वार्ध)
लाखमोलाच्या जागा
वडगावसारख्या व्यापारी पेठेत सरकारी आणि पालिकेच्या मालकीच्या ३३ जागा आहेत. या जागा मध्यवर्ती आणि मोक्याच्या जागी असून बाजारभावाप्रमाणे त्यांची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे. या ठिकाणी व्यापार करणाऱ्यांची तिसरी पिढी सध्या येथे व्यवसाय करत आहे.
शहरात ४४७ खुल्या जागा आहेत. त्यातील बहुतांश जागा भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या आहेत.
काही ठिकाणी अनधिकृत व्यवसाय सुरू
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी