येमेनच्या कैदेतून २० जहाज कर्मचाऱ्यांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:52 IST2020-12-05T04:52:12+5:302020-12-05T04:52:12+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : फेब्रुवारी महिन्यापासून येमेनमध्ये कैदेत अडकलेल्या २० जहाज कर्मचाऱ्यांची अखेर सुखरूप सुटका झाली आहे. यामध्ये ...

20 Yemeni crew released | येमेनच्या कैदेतून २० जहाज कर्मचाऱ्यांची सुटका

येमेनच्या कैदेतून २० जहाज कर्मचाऱ्यांची सुटका

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : फेब्रुवारी महिन्यापासून येमेनमध्ये कैदेत अडकलेल्या २० जहाज कर्मचाऱ्यांची अखेर सुखरूप सुटका झाली आहे. यामध्ये १४ भारतीय, ५ बांगलादेशी व एका इजिप्शियन नागरिकाचा समावेश आहे. १४ भारतीयांमध्ये रत्नागिरी, दापाेली, मंडणगड येथील नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी दुबईतील अल अदिल ट्रेडिंग समूहाचे अध्यक्ष मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

ओमानस्थित एका परदेशी जहाज वाहतूक (शिपिंग) कंपनीत काम करण्यासाठी हे २० जण जानेवारीत मस्कतला गेले होते. कंपनीला सौदी अरेबिया देशाचे वाहतुकीचे कंत्राट मिळाल्याने ते दोन जहाजांमधून ३ फेब्रुवारीला ओमानहून सौदी याम्बो बंदरापर्यंत प्रवासासाठी रवाना झाले. १२ फेब्रुवारीला वादळी हवामानामुळे खवळलेल्या समुद्राने यातील एका जहाजाचा घास घेतला. वाचलेल्या दुसऱ्या जहाजातून सर्वजण पुढे निघाले. परंतु, त्या जहाजालाही खराब हवामानामुळे नांगर टाकून एका जागी थांबावे लागले. दुर्दैवाने त्यांनी जहाज नांगरलेली जागा येमेनच्या युद्धप्रवण क्षेत्रात होती. येमेनी तटरक्षकांनी जहाजावर इशारादर्शक गोळीबार केला आणि नंतर सर्व कर्मचाऱ्यांना अटक करून येमेनच्या साना शहरातील एका हॉटेलात स्थानबद्ध केले. त्यांचे पासपोर्ट, मोबाईल, कागदपत्रे व रोख रक्कम जप्त केली.

ही माहिती समजल्यानंतर डॉ. दातार यांनी सक्रिय होऊन जिबोतीमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून पाठपुरावा केला. याकामी त्यांना जिबोतीतील भारतीय राजदूत अशोक कुमार, पुण्यातील धनश्री पाटील व माजी ज्येष्ठ राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांचे मोलाचे साह्य झाले. तसेच दुबईतील डॉ. सुनील मांजरेकर यांचेही प्रयत्न सफल झाले. अखेर गेल्या आठवड्यात या सर्व कर्मचाऱ्यांची सुटका झाली असून, ते आता जिबोतीमधील भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाली आहेत. ते लवकरच मुंबईला परततील.

जहाज कर्मचाऱ्यांतील भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरचे संदीप बाळू लोहार (खडकेवाडा, ता. कागल), नीलेश धनाजी लोहार (कौलव, ता. राधानगरी), फिरोज नसरुद्दीन झारी (रत्नागिरी), अहमद अब्दुल गफूर वाकणकर (दापोली), तन्मय राजेंद्र माने (मांडवा, अलिबाग), दाऊद महमूद जोवरक (मंडणगड), गोव्यातील चेतन हरिश्चंद्र गवस यांच्यासह दक्षिण भारत, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशमधील लोकांचा समावेश आहे.

Web Title: 20 Yemeni crew released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.