आजरा तालुक्यात २० वर्षांतील उच्चांकी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:16 IST2021-07-24T04:16:44+5:302021-07-24T04:16:44+5:30

आजरा तालुक्यात पावसाने गेले दोन दिवस थैमान घातले आहे. मुसळधार पडलेल्या पावसाने चाफवडे येथील पुलाचा भराव वाहून गेला, तर ...

20 years high rainfall in Ajra taluka | आजरा तालुक्यात २० वर्षांतील उच्चांकी पाऊस

आजरा तालुक्यात २० वर्षांतील उच्चांकी पाऊस

आजरा तालुक्यात पावसाने गेले दोन दिवस थैमान घातले आहे. मुसळधार पडलेल्या पावसाने चाफवडे येथील पुलाचा भराव वाहून गेला, तर खेतोबावरील शंकर डवरी यांची चार एकर भात शेती पाण्याखाली गेली आहे. आजरा-आंबोली रस्त्यावर घाटकरवाडीजवळ हिरण्यकेशीचे पाणी आल्याने वाहतूक थांबविण्यात आली होती. आजरा गडहिंग्लज रस्त्यावर भादवण तिट्ट्याजवळ रस्त्यावर बाभळीचे झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. मडिलगेत ओढ्याचे पाणी, तर साळगावमध्ये हिरण्यकेशी नदीचे पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. मासेवाडी येथील भुतेश्वर मंदिराचा संरक्षक कठडा तोडून पाणी मंदिरात शिरले. आजऱ्यातील सुतार गल्लीत खंदकातील पाणी अनेकांच्या घरात शिरले. नगरपंचायतीने दोन इंजिन लावून पाणी काढण्यास सुरुवात केली आहे.

दुपारी दोनपर्यंत चित्री धरण ९९ टक्के भरले होते. विद्युतगृहातून १८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. आंबेओहोळ धरण ८८ टक्के भरले असून, सांडव्यातून ७५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. हिरण्यकेशी नदीला महापूर आल्याने रामतीर्थाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही चार ते पाच फूट पाणी होते. या मार्गावर नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. तालुक्यातील खानापूर, एरंडोल व धनगरवाडी ही धरणे भरली असून, एरंडोलमधून १५०, तर धनगरवाडीमधून २०० क्युसेकने पाणी नदीपात्रात येत आहे. आजरा ३९९, मलिग्रे ३०९, उत्तूर ३४५, गवसे ३९२, एकूण ११४५, तर सरासरी ३६१ मि.मी. पाऊस झाला आहे. किटवडे परिसरात १२ तासांत ६६७ मि.मी. पाऊस झाला आहे.

चौकट : आजरा-महागाव रोडवरील संताजी पुलावर दुपारी बारा वाजेच्या सुमारास एका वेडसर व्यक्तीने पाण्यात उडी घेतली; पण दैव बलवत्तर म्हणून उसाच्या शेतात जाऊन तो अडकला. त्याला आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, उपनगराध्यक्ष बाळ केसरकर, कर्मचारी अरविंद केसरकर यांनी पाण्यातून बाहेर काढून जीव वाचविला आहे.

फोटो कॅप्शन १) आजऱ्याजवळील व्हिक्टोरिया पुलाच्या मच्छिंद्रच्या वर एक फूट आलेले पाणी. २) हिरण्यकेशी नदीचे पाणी सुलगाव तिट्ट्यावर आलेले असताना. ३) हिरण्यकेशी नदीचे पाणी आजऱ्यातील कृषी विभागाच्या बीजगुणन केंद्राच्या जमिनीमध्ये घुसल्यानंतरचे चित्र.

Web Title: 20 years high rainfall in Ajra taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.