करंजफेन, सावर्डीमध्ये २० घरे झाली जमीनदोस्त; रात्रीत घुसले पुराचे पाणी घरात : दावी कापून जनावरे सोडून दिल्याने वाचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST2021-08-01T04:22:50+5:302021-08-01T04:22:50+5:30
अणूस्कुरा : शाहूवाडी तालुक्यातील करंजफेन, सावर्डी येथे अस्मानी पावसाने वीस घरे जमीनदोस्त झाली असून, दोन म्हशी मातीत गडप ...

करंजफेन, सावर्डीमध्ये २० घरे झाली जमीनदोस्त; रात्रीत घुसले पुराचे पाणी घरात : दावी कापून जनावरे सोडून दिल्याने वाचली
अणूस्कुरा : शाहूवाडी तालुक्यातील करंजफेन, सावर्डी येथे अस्मानी पावसाने वीस घरे जमीनदोस्त झाली असून, दोन म्हशी मातीत गडप झाल्या आहेत. डोंगर खचल्याने सावर्डी-करंजफेन हा मार्ग बंद झाला आहे. लोकांसमोर पोटाला खायचे काय असा प्रश्न तयार झाला आहे.
कासारी नदीच्या महापुराचे पाणी २२ जुलैला घरात शिरल्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील करंजफेन येथे आठ व सावर्डी येथील बारा अशी एकूण वीस घरे पूर्णपणे पडून जमीनदोस्त झाल्याने सुमारे ६० लोक बेघर झाले आहेत, त्याच रात्री सावर्डी, करंजफेन मार्गावर पाच ठिकाणी डोंगर खचल्याने हा रस्ता बंद झाला. त्यामुळे सावर्डी व इजोली या गावांचा अद्याप संपर्क तुटला आहे. मध्यरात्री पुराचे पाणी घरात शिरल्याने लोकांची एकच धांदल उडाली. रात्रीच्या वेळी काय करावे हेच सुचेना, गोठ्यातील जनावरांची दावी कापून वाट मोकळी केली त्यामुळे पंचवीस जनावरे डोंगराकडे हाकलून त्यांचा जीव वाचवण्यात यश आले,परंतु सावर्डी येथील बाळू कोकरे यांच्या दोन म्हशी गोठ्यातच अडकल्या,त्यांच्या अंगावर दगड,माती, लाकूड, सामान पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. करंजफेनमधील बाळू शंकर कांबळे , रंगराव लक्ष्मण कांबळे, राजाराम लक्ष्मण कांबळे, संतू लक्ष्मण कांबळे, प्रदीप फाटक, मानसिंग पाटील, नानूबाई कांबळे, अमीन शेख, अल्ताफ शेख, मोजेम शेख यांची घरे उद्ध्वस्त झाल्यामुळे दुसऱ्याच्या घरात आसरा घ्यावा लागला. सावर्डी येथील धोंडिराम बाळू राठोड, पांडुरंग सकपाळ, कृष्णा पाडावे, बंडू रामा पाडावे, चंद्रकांत कोंडिबा पाडावे, राजाराम नारायण पाटील,तुकाराम सदाशिव जाधव, तुकाराम धोंडिराम कांबळे, बाळू महादू कोकरे यांना गावातील प्राथमिक शाळेत संसार मांडावा लागला आहे.
सव्वाशे पोती धान्य मातीत
घरातली एकही वस्तू न घेता अंगावरील कपड्यानिशी घर सोडून जीव वाचवण्यासाठी बाहेर पडावे लागले, प्रत्येक कुटुंबाची शेती हेच उत्पन्नाचे साधन असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे मिळून साधारणपणे सव्वाशे पोती धान्य मातीत गाडले गेले त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या घरांच्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करून शासकीय मदत व सामाजिक संस्थांनी हातभार लावून या कुटुंबांचे संसार उभे करण्याची गरज आहे.
फोटो ३१०७२०२१-कोल-धान्य
शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी येथील धोंडिराम ऱ्हाटवड यांचे घर जमीनदोस्त होऊन सुमारे चाळीस पोती धान्य त्याखाली गाडले गेले.