१९ जागा, शंभरावर इच्छुक
By Admin | Updated: July 6, 2015 00:30 IST2015-07-05T23:45:34+5:302015-07-06T00:30:28+5:30
आजरा तालुका संघ : निवडणूक दणक्यात होणार

१९ जागा, शंभरावर इच्छुक
आजरा : आजरा तालुका खरेदी-विक्री संघाकरिता ९८ उमेदवारांनी १४८ अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीविरूद्ध आजरा तालुका विकास आघाडी अशी थेट लढत होणार हे स्पष्ट झाले असले तरी या लढतीचाच फायदा मिळेल या उद्देशाने किमान डझनभर जादा उमेदवार रिंगणात दिसतील, असे चित्र आहे.
आजरा तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक ही आजरा साखर कारखाना निवडणुकीची रंगीत तालीम आहे. अवघ्या दहा महिन्यांवर आजरा साखर कारखान्याची निवडणूक आहे. कारखान्याचे सर्वच संचालक तालुका संघाच्या निवडणुकीत सक्रीय आहेत. कारखाना संचालक मंडळातील वाद जगजाहीर असल्याने याचेच पडसाद तालुका संघ निवडणुकीत उमटू लागले आहेत.
आजरा विकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणुकीला सामोरे जाणारी व आघाडीचे नेतृत्व करणारी बरीचशी मंडळी राष्ट्रवादीचीच आहेत. अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, दिगंबर देसाई, संभाजी तांबेकर, राजू होलम, काशीनाथ तेली, महादेव पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचाच शिक्का आहे. आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील यांनी राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनेल राहील, असे स्पष्ट केल्याने वरील सर्व मंडळी सध्या राष्ट्रवादीत नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा बँकेमध्ये अशोक चराटी यांना छुपा पाठिंबा देणारी रवींद्र आपटे, उमेश आपटे, अंजनाताई रेडेकर इत्यादी मंडळी आपापल्या पक्षाचा झेंडा कायम ठेवून आजरा विकास आघाडीत दाखल झाली आहेत. वसंतराव धुरे, जयवंतराव शिंपी, मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, उदय पवार, आदी मंडळी राष्ट्रवादीचा गाडा हाकत आहेत.
दोन्ही आघाडीप्रमुखांनी सर्वच इच्छुकांना प्रथम उमेदवारी अर्ज भरा बाकीचे नंतर पाहू , असा संदेश दिल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. आता माघारीवेळी इच्छुकांपेक्षा आघाडीप्रमुखांची अवस्था वाईट होणार आहे. दोन्ही आघाड्यांमधून प्रमुख उमेदवारांची नावे निश्चित आहेत. अशा उमेदवारांची संख्या २५ च्या आसपास आहे. आरक्षित जागा सोडल्यास दोन्हीकडून केवळ ४-५ उमेदवार निश्चित होणे बाकी आहे.
यासाठी सुमारे ५० उमेदवार इच्छुक आहेत. उमेदवारी दिली नाही म्हणून असे इच्छुक विरोधात जाण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून पॅनेलमधील समावेशाची जबाबदारी पॅनेलप्रमुखांवर टाकली आहे. त्यामुळे पॅनेलप्रमुखांची चांगलीच दमछाक होत आहे. (प्रतिनिधी)
हसन मुश्रीफ व के.पीं.नी विडा उचलला
आजरा तालुका खरेदी-विक्री संघामध्ये राष्ट्रवादीचेच पॅनेल कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याचा विडा आमदार मुश्रीफ व के.पी. पाटील यांनी उचलल्याने आजरा साखर कारखान्यानंतर आजरा तालुका संघाची निवडणूक आमदार मुश्रीफ, के. पी. व संध्यातार्इंच्या दृष्टीने प्रतिष्ठेची बनली आहे.