१८१ जणांना मिळणार घरकुल
By Admin | Updated: September 5, 2014 23:24 IST2014-09-05T21:50:39+5:302014-09-05T23:24:34+5:30
इचलकरंजी पालिका : ‘रमाई आवास’ अंतर्गत तीन कोटींचा प्रकल्प

१८१ जणांना मिळणार घरकुल
इचलकरंजी : रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी असलेल्या शहरातील १८१ लाभार्थ्यांच्या घरकुलांचे स्वप्न साकार होत आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या साईट क्रमांक १०२ मध्ये २.७१ कोटी रुपये खर्चाच्या घरकुलांच्या सहा इमारती उभ्या राहत आहेत.अनुसूचित जाती व नवबौद्धांमधील दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबीयांना त्यांच्या हक्काचे आणि शंभर टक्के अनुदान असलेले घरकुल बांधून देण्याची रमाई आवास योजना राज्य शासनाची आहे. या योजनेंतर्गत ‘अ’ वर्ग नगरपालिका हद्दीमधील लाभार्थ्याला दीड लाख रुपये खर्चाचे आणि २९५ चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ असलेले घरकुल बांधून मिळणार आहे. शहरात असलेल्या १८१ लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजनेची घरकुले मिळावीत, असा प्रस्ताव सुवर्ण जयंती विभागाकडून शासनाकडे दिला होता. त्याला मंजुरी मिळून त्यासाठी दोन कोटी ८८ लाख रुपयांचे अनुदान नगरपालिकेच्या खात्यावर सन २०१३मध्ये शासनाने जमा केले होते.
रमाई आवास योजनेंतर्गत नगरपालिकेकडील या योजनेचा नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व गटनेते बाळासाहेब कलागते यांनी पाठपुरावा केला. बांधकाम खात्याकडे धूळ खात पडलेली कागदपत्रांची फाईल शोधून काढण्यात आली. नगरअभियंता भाऊसाहेब पाटील व अभियंता संजय बागडे यांनी या योजनेला पुनर्आकार दिला. आता या योजनेची घरकुले बांधण्यासाठीच्या इमारतीची पायाभरणी उद्या, शनिवारी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते व माजी खासदार निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर का होईना रमाई आवास योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना वर्षभरात स्वमालकीचे घर मिळेल, अशी आशा पल्लवित झाली आहे. (प्रतिनिधी)