तृप्ती देसाई यांच्यासह १८ जणांना अटक
By Admin | Updated: June 5, 2016 01:07 IST2016-06-05T01:07:50+5:302016-06-05T01:07:50+5:30
अंबाबाई मंदिर प्रवेश प्रकरण : पोलिस निरीक्षक देशमुखांना निलंबित करण्याची मागणी

तृप्ती देसाई यांच्यासह १८ जणांना अटक
कोल्हापूर : अंबाबाई देवी मंदिरात गाभाऱ्यातील मारहाण प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करावी व या घटनेवेळी बेजबाबदारपणा करणाऱ्या कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांना निलंबित करावे, या मागणीसाठी पोलिस ठाण्याजवळ ठिय्या आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह १८ जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याच चार पुरुषांचाही समावेश आहे.
अंबाबाई देवी मंदिरातील गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून देसाई यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी १३ एप्रिल २०१६ ला मंदिरात आंदोलन केले होते. त्यावेळी देसाई यांना गाभाऱ्यात मारहाण झाली होती. या प्रकरणी यापूर्वी पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. यातील उर्वरित आरोपींना अटक करावी, अशी मागणी देसाई यांनी पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्याकडे केली होती; पण, देशमुख यांनी उर्वरित आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ केली असल्याने तृप्ती देसाई यांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानुसार, शनिवारी देसाई यांच्यासह महिलांनी पोलिस ठाण्याजवळ सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ठिय्या मारला. आंदोलकांनी मारहाण प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करा व देशमुख यांना निलंबित करा, अशा जोरदार घोषणा दिल्या. मागण्यांची दखल घेत नाही, तोपर्यंत येथून न हलण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी देसाई यांच्यासह अन्य महिलांना पोलिसांनी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्यानंतर लगेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण उनाळे यांच्या न्यायालयात हजर केले.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे : तृप्ती प्रशांत देसाई ( रा. धनकवडी, पुणे), मनीषा राहुल टिळेकर, कांतिलाल सीताराम गवारे, शहनाज निसार शेख (तिघी राहणार भवानी पेठ, पुणे), बिस्मिला शब्बीर कागदे, मदिना जहॉँगीर सनदी, वहिदा रफिक सनदी, सबीना इस्माईल सनदी, फरजाना रशीद सनदी (सर्व रा. घुणकी, ता. हातकणंगले.), आनंदी प्रकाश पाटील, मंगल बबन ओंकार, अमीर गुलाब मुल्ला, झाकीर अल्ताफ शेख, शाहरूख अकबर सनदी (तिघे रा. वडणगे, ता. करवीर), माधुरी सुरेश शिंदे (रा. उदगाव, ता. शिरोळ.), आशा सुरेश गाडीवडर (रा. जयसिंगपूर, ता. हातकणंगले)