दूध संस्था कर्मचारी संघटनेकडून १८ लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST2021-02-05T07:14:36+5:302021-02-05T07:14:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेकडून आपल्या सभासदांना गेल्या दहा महिन्यांत वैद्यकीय उपचारासह ...

दूध संस्था कर्मचारी संघटनेकडून १८ लाखांची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेकडून आपल्या सभासदांना गेल्या दहा महिन्यांत वैद्यकीय उपचारासह मृत सभासदांना १८ लाखांची मदत दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष के. डी. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. काेरोनाबाधित कर्मचाऱ्यांना उपचारासाठी ८ लाख रुपये, तर दोन मृत कर्मचाऱ्यांना दोन लाख रुपये अशी दहा लाखांची मदत दिल्याचेही त्यांनी सांगितले.
संघटनेच्या वतीने विविध योजना राबवल्या जातातच, त्याशिवाय कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून दूध संस्था कर्मचाऱ्यांनी काम केले. कोरोनाबाधित कर्मचाऱ्याने शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यास दहा हजार, खासगी रुग्णालयासाठी तीस हजार, तर दुर्दैवाने कोरोनाने मृत्यू झाल्यास एक लाख रुपये मदत दिली. या योजना राबविण्यासाठी ‘गोकुळ’चे सहकार्य मोठे असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष शामराव पाटील, जनरल सेक्रेटरी विश्वास पाटील, खजानिस सुरेश जाधव उपस्थित होते.
असंघटित दूध कर्मचाऱ्यांची पहिली संघटना
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या दूध व्यवसायासाठी निगडित दूध संस्थांचे कर्मचारी असंघटित आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील या असंघटित कर्मचाऱ्यांना संघटित करणारी ही पहिली संघटना आहे.
दृष्टिक्षेपात संघटना-
सभासद - ९१४२
गुंतवणूक - १ कोटी ४ लाख
स्थावर व जंगम मालमत्ता - ३८ लाख ७४ हजार
नफा - ७ लाख २८ हजार
योजना -
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये देऊन यथोचित सत्कार
कर्मचाऱ्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार व अपघाती मृत्यूस १ लाख रुपये
अवयवाचे कायमचे अपंगत्व ५० हजार, दोन्ही अवयवांचे कायम अपंगत्व एक लाख
कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी वीस हजार रुपये