किणेत मधमाशांच्या हल्ल्यात १७ जखमी
By Admin | Updated: April 8, 2016 00:24 IST2016-04-08T00:14:53+5:302016-04-08T00:24:48+5:30
दैव बलवत्तर म्हणूनच..

किणेत मधमाशांच्या हल्ल्यात १७ जखमी
आजरा : किणे (ता. आजरा) येथे बसस्थानक आवारात तारओहोळ शेजारील झाडावरील मधमाश्यांच्या पोळ्यावर शाळकरी मुलांनी दगड मारल्याने मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात या परिसरातील १७ जण जखमी झाले असून, या हल्ल्यात चार बकऱ्यांसह कुत्रेही गंभीर जखमी झाले आहे.सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक मधमाश्या उठल्या व त्यांनी या परिसरातील खेळणाऱ्या शाळकरी मुलांसह दिसेल त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या प्रकाराने ग्रामस्थ भांबावून गेले, तर शाळकरी मुलांची पळापळ सुरू झाली. शाळकरी मुलांनी दिसेल त्या घराचा आधार शोधला. रस्त्यावरील व बसस्थानक परिसरातील गोंधळ पाहून येथून जाणाऱ्या वाहनचालकांनी वाहने जागीच थांबवली.या हल्ल्यात दशरथ केसरकर, संजय मांगले, उषा मांगले, शंकर होलम, विठोबा रेमळे, गोपाळ नाईक, बाबूराव पाटील, सोनम पाटील, आशिष केसरकर, शर्करी गोरे, फिरोज मुल्ला, अविष्कार ससाणे, अनिरुद्ध गोरे, ओंकार मांगले, गायत्री पाटील, आदी १७ जण जखमी झाले. संजय मांगले यांच्या मालकीची चार बकरी व दशरथ गिलबिले यांचे एक कुत्रेदेखील यातून बचावले नाही. बकऱ्यांची दावी ग्रामस्थांनी तोडून त्यांची सुटका केली.
नेसरी येथून रुग्णवाहिका मागवून जखमींना नेसरी, वाटंगी व आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. नेसरी ग्रामीण रुग्णालयात डॉ. ए. एस. पाटील, वाय. पी. कोले, भूषण इंगवले, संतोष लोट यांनी रुग्णांवर उपचार केले. (प्रतिनिधी)
दैव बलवत्तर म्हणूनच..
मधमाश्यांचा हल्ला झाल्यानंतर हल्ल्यात सापडलेले दशरथ केसरकर यांनी जीव वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र, मधमाश्यांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून केसरकर जीव मुठीत घेऊन पाण्याच्या बाहेर आले. तरीही मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केलाच. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वाटंगी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.