जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी १७ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST2021-08-18T04:30:38+5:302021-08-18T04:30:38+5:30
कोल्हापूर : महापुरामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात १७ कोटी ४२ लाख ५ हजार इतका निधी पूरग्रस्तांना ...

जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी १७ कोटींचा निधी
कोल्हापूर : महापुरामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात १७ कोटी ४२ लाख ५ हजार इतका निधी पूरग्रस्तांना आगाऊ मदत देण्यासाठी मिळाला आहे. प्रत्येक बाधीत कुटुंबाला सानुग्रह अनुदान म्हणून ५ हजार रुपये दिले जाणार असून ही रक्कम तालुक्यांना वर्ग करण्यात आली आहे. त्यापुढे मिळणारा निधीदेखील टप्प्या-टप्प्याने बाधितांना वितरीत करण्यात येणार आहे.
पुरामुळे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या पूरग्रस्तांना लवकर मदत मिळावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्याला १७ कोटी ४२ लाख ५ हजार इतका निधी १० ऑगस्टला मिळाला आहे. त्या-त्या तालुक्यातील बाधित नागरिकांना मदत देण्यासाठी हा निधी तहसीलदार यांना वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत शहरी व ग्रामीण भागात मिळून सुमारे ६९ हजार ६८२ कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे. महसूल विभागाने केलेले पंचनामे, कागदोपत्री पुरावे, नुकसानीचे प्रमाण आणि प्रकार याची पडताळणी करून ही रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आणखी ८ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
--
तालुकानिहाय रक्कम (लाखात)
तालुका : बाधीत कुटूंब : रक्कम
करवीर- २५ हजार ६०० : ६४०
शिरोळ-२० हजार ३१४ : ५०७.८५
अपर तहसीलदार इचलकरंजी- ८ हजार ८ : २००.२
हातकणंगले- ५ हजार ३४७ : १३३.६७५
पन्हाळा- ३ हजार १४३ : ७८.५७५
कागल-२ हजार ४२१ : ६०.५२५
गडहिंग्लज-१ हजार ९१८ : ४७.९५
शाहूवाडी-१ हजार ४९४ : ३७.३५
भुदरगड- ४०८ : १०.२०
चंदगड- ४११ : १०.२७५
गगनबावडा- ३०० : ७.५०
राधानगरी-२३० : ५.७५
आजरा- : ८८ : २.२०
----