कैद्यांची चंगळ! कारागृहात मांसाहार, मिठाईसह मिळतात १६७ खाद्यपदार्थ!

By उद्धव गोडसे | Published: January 23, 2024 12:11 PM2024-01-23T12:11:43+5:302024-01-23T12:12:15+5:30

उद्धव गोडसे कोल्हापूर : कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगारांना अर्धवट भाजलेल्या चपात्या, पाणीदार आमटी आणि बेचव भात खाऊन दिवस काढावे ...

167 foods including meat and sweets for prisoners in prison | कैद्यांची चंगळ! कारागृहात मांसाहार, मिठाईसह मिळतात १६७ खाद्यपदार्थ!

कैद्यांची चंगळ! कारागृहात मांसाहार, मिठाईसह मिळतात १६७ खाद्यपदार्थ!

उद्धव गोडसे

कोल्हापूर : कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगारांना अर्धवट भाजलेल्या चपात्या, पाणीदार आमटी आणि बेचव भात खाऊन दिवस काढावे लागत असतील, असा तुमचा समज असेल तर जरा थांबा. आपण घरात खातो त्याहीपेक्षा जास्त आहार कैद्यांना शासकीय खर्चातून मिळतो. शिवाय कारागृहातील कॅन्टीनमध्ये अंडी, चिकन, मिठाई यासह १६७ वस्तू उपलब्ध असतात. अमली पदार्थ वगळता इतर बहुतांश वस्तू कैद्यांना स्वखर्चातून मिळतात, त्यामुळे शिक्षेदरम्यानही कैद्यांची चंगळ असते.

केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताना कैद्याला पश्चाताप व्हावा, यासाठी पूर्वी अनेक प्रकारच्या यातना दिल्या जायच्या. शारीरिक कष्ट करून घेऊन त्याला पुरेसे खायला दिले जात नव्हते. याशिवाय मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे कैद्यांसाठी कारागृहातील जगणे कठीण ठरत होते. मात्र, कालांतराने कैद्यांनाही त्यांचे अधिकार मिळायला हवेत, या मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांना सुविधा पुरवल्या जात आहेत. यामुळे कारागृहातील कैद्यांचे जगणे सुसह्य ठरत आहे. 

कळंबा मध्यवर्ती कारागृहात सध्या सुमारे २१०० कैदी शिक्षा भोगतात. त्यांना रोज सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान चहा दिला जातो. आठ वाजता नाष्टा. यात कांदापोहे, उपमा, शिरा यापैकी एक पदार्थ आणि दूध दिले जाते. सकाळी दहा वाजता जेवणाची वेळ होते. यात तीन चपात्या, भाजी, वरण, भात आणि केळी असे असते. दुपारी तीनला चहा मिळतो. सायंकाळी पाच वाजता जेवण दिले जाते. हे जेवण कैदी त्यांच्या सोयीने कधीही खाऊ शकतात. आठवड्यातून एकदा खीर, अंडी किंवा सणासुदीला गोड पदार्थांची मेजवानी असते. हा सर्व आहार शासकीय खर्चातून मिळतो.

स्वखर्चातून बरेच काही उपलब्ध

कारागृहातील कॅन्टीनमध्ये अंडी, चिकन, सुका मेवा, फरसाण, चिवडा, शेंगदाणे, चिरमुरे, चिक्की, चॉकलेट्स, मिठाई असे अनेक खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. हे पदार्थ कैद्यांना स्वखर्चातून घ्यावे लागतात. यासाठी त्यांना दरमहा नातेवाइकांकडून मनीऑर्डर स्वीकारता येते. तसेच कारागृहात केलेल्या कामाचा मेहनताना मिळतो. यातून ते खाद्य पदार्थांचा खर्च भागवतात.

असे असते दिवसभरातील आहाराचे प्रमाण

  • सहा चपात्या - ४०० ते ६०० ग्रॅम पिठाच्या
  • भाजी - २५० ग्रॅम
  • वरण किंवा डाळ - ९० ग्रॅम
  • दूध - २५० ग्रॅम
  • चहा - दोन कप


राज्यात ६० कारागृहे

  • मध्यवर्ती कारागृहे - ९
  • जिल्हा कारागृहे - ३१
  • खुले कारागृह - १९
  • महिला कारागृह - १


करमणूक आणि शिक्षणाचीही सोय

कैद्यांच्या करमणुकीसाठी कारागृहात खेळाची साधने उपलब्ध असतात. मोकळ्या वेळेत कैदी खेळ खेळून मनोरंजन करतात. याशिवाय कारागृहातून शिक्षणही घेता येते. त्यासाठी शिक्षक आणि वाचनालयाची सोय असते.

कुटुंबापासून दूर राहणे हीच मोठी शिक्षा

कारागृहात सुविधा असल्या तरी शिक्षा ती शिक्षाच असते. कुटुंबापासून दूर राहावे लागते. कारागृहातील अन्य कैद्यांच्या संगतीत मनात नकारात्मक विचार निर्माण होतात. चार भिंतींच्या आतील वातावरणात मनाचा कोंडमारा होतो. यामुळे त्या वाटेला न जाणे हेच चांगले.

कारागृह हे सुधारगृह आहे. कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाते. शासकीय नियमानुसार कैद्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातात. - पांडुरंग भुसारे - प्रभारी अधीक्षक, कळंबा कारागृह
 

Web Title: 167 foods including meat and sweets for prisoners in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.